मुंबई - विलेपार्ले येथील रस्ता रुंदीकरणात काही घरांच्या अर्ध्या भागावर पालिकेकडून कब्जा केला जाणार आहे. अशा रहिवाशांना सुनावणीसाठी हजार राहण्याचे सांगून ऐनवेळी सुनावणी रद्द करण्यात आली. यामुळे संतप्त रहिवाशांनी पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सिंघल रहिवाशांवर भडकल्यामुळे पालिका मुख्यालयातील वातावरण तापले होते.
महापालिकेच्या के पूर्व वॉर्डमधील, अंधेरी पूर्वेतील व्ही. एस. खांडेकर मार्गावरील (आझाद रोड) काही जुनी घरे रस्ता रुंदीकरणाच्या आड येत असल्यामुळे काही भागावर कब्जा केला जाणार आहे, अशी नोटीस पालिकेच्या रस्ते विभागाच्या स्थानिक उपमुख्य अभियंत्यांनी २६ जुलै २०१८ रोजी स्थानिक रहिवाशांना बजावली आणि यासंबंधी काही आक्षेप-सूचना असल्यास सोमवारी पालिका मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या दालनात सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहावे, असे त्यात नमूद केले होते. ही नोटीस १०० हून अधिक रहिवाशांना मिळाल्यानंतर बरेच रहिवासी सोमवारी मुख्यालयात पोहोचले, परंतु पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी काहीच रहिवाशांना अतिरिक्त आयुक्तांकडे जाण्याची परवानगी दिली. अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात गेल्यानंतर त्यांना आजची सार्वजनिक सुनावणी रद्द केली आहे, असे आयत्या वेळी सांगितल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली होती. रहिवाशी आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्यामुळे अतिरिक्त आयुक्त सिंघल रहिवाशांवर संतापले. याप्रकारची लेखी तक्रार पालिका आयुक्तांकडे केली जाणार असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.