
बेस्ट उपक्रमाचा सन २०१९-२० चा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना सादर केला आहे. हा अर्थसंकल्प ६०७५.६८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. बेस्टला ५३५५.१४ कोटींचा महसूल प्राप्त होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने बेस्टला ७२० कोटी रुपयांची तूट सहन करावी लागणार आहे. बेस्टने या आधी सन २०१७ – १८ चा ५८० कोटी, सन २०१८-१९ चा ८८० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता.
बेस्ट थांब्यावर बेस्ट बसची वाट पाहत प्रवाशांना तासनतास ताटकळत उभं रहावं लागतं. प्रवाशांची ही गैरसोय दूर करत त्यांना बसची अचूक वेळ कळावी यासाठी 'इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेन्ट सिस्टीम' (आयटीएमएस) नावाने खास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. बस आगार, बस स्थानक आणि बसचौकी येथील वाहतूक प्रवर्तनात्मक कार्याचं संगणकीकरण करण्यात येईल.
संगणकीय प्रणालीमुळं बस मार्गावर कार्यरत असलेल्या बसगाड्यांची आणि बसमार्गाची माहिती अचूक वेळेसह प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. पॅसेंजर इन्फाॅर्मेशन सिस्टीम (पीआयएस)द्वारे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचं स्थळ तसंच येणाऱ्या बसथांब्यांची माहिती उद्घोषणेद्वारे मिळणार आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत बेस्टच्या ताफ्यात ४०५० बस वाढवण्याचे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे.