
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे, सन्माननीय व्यक्ती विधान परिषद अथवा विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी सदस्यांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एस.टी. च्या कोणत्याही प्रकारच्या (अश्वमेध, शिवनेरी,शिवशाही, हिरकणी, व परिवर्तन) बसमधून महाराष्ट्र व आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येणार आहे. सदर प्रवासासाठी संबंधित विधिमंडळ सदस्याकडे विधानमंडळ सचिवालयाने पुरविलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आजी/माजी विधिमंडळ सदस्यांनी सर्वसामान्यांचे हक्काचे दळणवळणाचे साधन असलेल्या एस.टी मधून प्रवास केल्यास, त्यातून सकारात्मक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल. यातून असुरक्षित, अवैध व खाजगी वाहतुकीऐवजी सुरक्षित व वक्तशीर धावणाऱ्या एसटीचा पर्याय जास्तीत जास्त लोकांना स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल.