मुंबई - देशात नरेंद्र मोदी सरकारने नोटबंदी केली. ही नोटबंदी करून काय साध्य झाले हे मोदी सांगू शकलेले नाहीत. मात्र या नोटबंदीच्या आड ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे पैसे पांढरे करण्यात आले. मोदी राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करतात यामुळे अशा ब्लॅकमेलर लोकांना सत्तेत बसवू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ईशान्य मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांची प्रचार सभा विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर येथील संभाजी मैदानात संपन्न झाली. या सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना, देशात नोटबंदी ही कोणाच्या फायद्यासाठी करण्यात आली ते आजपर्यंत उघड झालेले नाही. देशात दोन अर्थव्यवस्था चालतात एक कर भरणारी तर दुसरी काळी अर्थव्यवस्था. त्या व्यवस्थेला सरकारशी काही एक घेणे देणे नसते. नोटबंदीचा निर्णयाद्वारे काळ्या अर्थव्यवस्थेला ब्लॅकमेल करायचे होते. ज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे, त्यानी मांडवली करून ७०: ३०, ६०:४० असे करून हा काळा पैसा व्हाइट करून घेतला. तो केला नसता तर तुझे पैसे वाया गेले समज अशी धमकी देऊन नोटबंदी करण्यात आली. नोटबंदी ही ब्लॅकमेलींग आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
शिवसेना आणि भाजपा युती तुटली होती. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात बोलत होते. त्यानंतर पुन्हा दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातले. यावरून उद्धव ठाकरे यांना मोदी आणि फडणवीस यांनी काय ब्लॅकमेल केले याची अजून माहिती मिळाली नाही. भाजप सोबत युती का केली हे उद्धव ठाकरे यांनी अजून सांगितले नाही. नरेंद्र मोदी यांनी आपण दहावी पास डॉक्टर आल्याचे सांगितले आहे. मोदी यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर केसेस दाखल करण्याची धमकी दिली आहे. मोदी ब्लॅकमेलिंगचे राजकारण करत आहेत. राजकारणात ब्लॅकमेलिंग असता कामा नये. आज ब्लॅकमेलर लोक सत्तेवर बसली असल्याने त्यांना पुन्हा सत्तेत बसवू नका असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.