मुंबई - मुंबई महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सर्तक आणि सक्षम आहे. परंतु, आपत्ती घडल्यानंतर हा विभाग कामाला लागतो. मात्र, आपत्ती रोखण्यासाठी किंवा त्याचे विपरित परिणाम टाळण्यासाठी या यंत्रणेचा वापर व्हायला हवा, असे महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त प्रविण परदेशी यांनी स्पष्ट केले. सोमवारी पदभार हाती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
पावसाळा तोंडावर आला आहे. दरवर्षी पावसाचे पाणी साचून मुंबई ठप्प होते. मागील वर्षी पाणी साचण्याची अडीचशे ठिकाणी होते. यंदाही दोनशे ठिकाणे सापडली आहेत. आतापर्यंत ३० ठिकाणची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील. पाणी साचू नये म्हणून उपाययोजना व तत्काळ कार्यवाही केली जाईल. आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी सीसीटीव्ही कॅमेरे कनेक्ट करण्यात आलेत. पाण्याचा तात्काळ निचरा कसा होईल, याबाबत प्रशासनाचे नियोजन आहे. वेळप्रसंगी पाणी साचण्याच्या ठिकाणचा परिसर पालिका अधिनियमानुसार ताब्यात घेण्यात येईल, असे परदेशी यांनी स्पष्ट केले. तसेच आपत्कालीन घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. एखाद्या आपत्तीनंतर ही यंत्रणा कामाला लागते. परंतु, आपत्ती रोखण्यासाठी तिचा वापर व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोस्टल रोडमुळे पर्यावरण आणि मासेमारीला कोणताही धोका होणार नाही अशा प्रकारे हा रस्ता पूर्ण करायचा आहे. त्यासाठी तसे नियोजन करण्यात आले आहे. कोणाचा विरोध किंवा शंका असल्यास ती चर्चा करून सोडवली जाईल. रस्ता पूर्ण झाला तर शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे. कोस्टल रोडखाली कोळीबांधवांसाठी मार्ग ठेवला आहे. ते त्यांना समजावून सांगणार असल्याचे परदेशी यांनी संगितले.
जलयुक्त शिवाराच्या धर्तीवर नालेसफाई -
नालेसफाईच्या कामांत अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. गाळ काढला जात नसल्याने पावसाळ्यात पाणी साचते. मात्र, यावर वचक ठेवण्यासाठी राज्यात राबविलेल्या जलयुक्त शिवाराच्या धर्तीवर जीपीएस ईमेज कार्यप्रणाली राबवता येईल. जेणेकरुन नालेसफाईची कामे चांगली होण्यास मदत होईल, असे परदेशी म्हणाले.
ठेकेदार हद्दपार झालाच पाहिजे -
नालेसफाईतील घोळ समोर आल्यावर ठेकेदारांवर कारवाई झाली. अनेक ठेकेदारांना पालिकेने काळ्या यादीत टाकले. मात्र, नाव बदलून ठेकेदार पुन्हा शिरकाव करतात. अशांवर जबर बसविण्यासाठी कठोर कारवाई व्हायला हवी. केवळ नालेसफाईतच नव्हे तर प्रत्येक खात्यात बनवाबनवी करणारे ठेकेदार हद्दपार झालेच पाहिजेत, अशी ठाम भूमिका परदेशी यांनी मांडली.
अधिकाऱ्यांवरील कारवाई शिथील होणार -
मुंबईत अनेक दुर्घटना होतात. त्यावेळी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. दोषींवर कारवाई होणारच, पण चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही. घोटाळ्यांमध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई करणे हा सरकारी नियमच आहे. त्यानुसार कारवाई व्हायलाच हवी. कामकाजात पारदर्शकता तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी येथे सुरु केलेली कार्यपद्धती मी पुढेही सुरु ठेवणार असेही परदेशी यांनी स्पष्ट केले.