नवीन आणि बलशाली महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र या - राज्यपाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2019

नवीन आणि बलशाली महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र या - राज्यपाल

मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्र हे देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून ते देशाचे आर्थिक शक्ती केंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे सांगताना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापनदिनी नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,असे आवाहन केले.

महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव यु. पी. एस. मदान, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्यासह राज्य शासन आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे कौन्सुलेट जनरल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र हे शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार आणि दळणवळण क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य असून देशातील अत्यंत विकसित आणि समृद्ध राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो असे सांगून राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यामध्ये मुंबईचे फार मोठे योगदान आहे. मुंबई शहरात बहुसंख्य बँका, उद्योग समूह आणि वित्तीय संस्था यांची मुख्यालये आहेत. देशाचा सर्वात मोठा शेअर बाजार आणि जगप्रसिद्ध चित्रपट नगरी याच शहरात आहे. मुंबई भारताच्या महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असून येथून खूप मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार चालतो. औद्योगिक उत्पादने, आर्थिक आणि सेवा क्षेत्राचे हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योगनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून पुणे शहर उदयास आले आहे. नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर ही शहरे देखील विकासाची शक्तीकेंद्रे आहेत.

सुरक्षित सायबर सेवा देण्यात राज्य आघाडीवर -
सायबर सुरक्षेची अंमलबजावणी करण्यात आणि नागरिक व उद्योग व्यवसायांना सुरक्षित सायबर सेवा देण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक राज्याची मोठी शक्ती असून महाराष्ट्र हा शांतता, प्रगती आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने सतत वाटचाल करत राहील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

सामाजिक सुधारणांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर -
सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिल्याचे राज्यपालांनी नमूद केले. ते म्हणाले की, सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धेचे उच्चाटन यासाठी आयुष्य वेचणाऱ्या ध्येयवादी नेत्यांचा वारसा राज्याला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर आणि समाजसुधारक नेत्यांचे आज स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या विविधतेत भारताचे दर्शन -
महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते असे सांगून राज्यपाल राव म्हणाले की, देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासक यांना आकर्षित करणारी उच्च दर्जाची विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था राज्यात आहेत. विलोभनीय समुद्रकिनारे,पर्वत रांगा, वने, गड-किल्ले, नदी खोरे आणि पठारे यामुळे आपले राज्य नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध झाले आहे. विपूल जैवविविधतेने नटलेली ताडोबा, मेळघाट, पेंच सारखी अभयारण्ये राज्याला लाभली आहेत, त्यामुळेच पर्यटकांनाही राज्याने आकर्षित केले आहे.

Post Bottom Ad