शिवसेनेच्या दिग्गजांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2019

शिवसेनेच्या दिग्गजांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी


मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. शिवसेनेने १८ खासदारांची आकडेवारी कायम ठेवली. मात्र विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गिते, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, शिवाजीराव अढळराव पाटील, या शिवसेनेच्या दिग्गजांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात युतीला राज्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. मात्र शिवसेनेच्या हातातून शिरुर, अमरावती, रायगड हे मतदारसंघ निसटले आहेत. हातकणंगले, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर या जागा जिंकून उद्धव ठाकरे यांनी ही तूट भरून काढली असली, तरी या नेत्यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागणार आहे. शिरुरमध्ये सेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला. अमरावती मतदारसंघात आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात नवनीत राणा यांनी कडवी झुंज देत शिवसेनेकडून हा मतदारसंघ खेचून घेतला. रायगडमध्ये अनंत गीते यांच्याविरोधातील नाराजी शिवसेनेला शेवटच्या क्षणापर्यंत दूर करता आली नाही. त्यामुळे तिथेही राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी बाजी मारली. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांना पक्षातंर्गत मोठा विरोध होता, मात्र हा विरोध डावलून पुन्हा खैरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यात खैरे यांनी केलेली वादग्रस्त विधानेही प्रचाराचा मुद्दा बनला होता. विशेष म्हणजे या ठिकाणी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतांचे विभाजन झाले असून त्याचा फटका चंद्रकांत खैरे यांना बसल्याचे दिसले. रात्री उशीरापर्यंत खैरे विरुद्ध जलील अशी अटीतटीची लढत सुरू होती.

Post Bottom Ad