मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात भाजपने भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादीने केलेल्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. शिवस्मारकाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रेच ऱाष्ट्रवादीचे नवीब मलिक आणि कॉंग्रसच्या सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. हिंमत असेल तर आजच मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचा खुलासा करावा, असं आव्हानही त्यांनी दिलं. आम्ही दुसऱ्या टप्प्यात आणखी कागदपत्रे सादर करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं
यावेळी नवाब मलिक म्हणाले, अरबी समुद्रात उभे राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. टेंडर देण्यापासून ते मूळ स्मारकाची रचना बदलण्यासाठी यात घोटाळा झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि ते स्वतः जबाबदार आहेत. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा आरोप मलिक यांनी केली. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याविषयी आम्ही केंद्रीय दक्षता आयोगाकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. भाजपच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांनाही सोडले नाही. या प्रकल्पात 3 समित्या होत्या, त्यात दबाव मुख्यमंत्र्यांच्या समितीचा होता, असा आरोप मलिक यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी राज्यात भ्रष्टाचार मुक्त घोषणा केली. पण, 21 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अरबी समुद्रातील स्मारकाचे मोदी यांनी जलपूजन केले. त्यात मोठा भ्रष्टाचार केला गेला. टेंडर काढून 1300 कोटी कमी करून रचना बदलण्यात आली. लेखा परीक्षकांच्या 2 अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतले. त्यानंतर या टेंडरला मुख्यमंत्री कार्यालयाने मंजुरी दिली. टेंडर देताना ते नियोजितपणे देण्यात आले. री टेंडर करण्यात आले नाही. याचे ऑडिट होणे आवश्यक असताना ते केले गेले नाही. समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असताना हा भ्रष्टाचार झाला आहे. राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार हा मुख्यमंत्री कार्यालयात झाला आहे. यावर आजच मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी मलिक यांनी केली.
तर सचिन सावंत म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयातून एल अँड टी या कंपनीला स्मारकाचे कंत्राट देण्यात आले. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ज्यांनी खुलासा पाठवला, त्यांनी अजून ऑडिट का केले नाही? याचा अगोदर खुलासा करावा, अशी मागणी सावंत यांनी केली. एकदा टेंडर दिल्यावर त्यात बदल केला जात नाही. तरीही त्यांनी केला. सुरुवातीला स्मारकाची 121 मीटर उंची होती, त्यानंतर ती 83 मीटर करण्यात येणार होती. नंतर ती उंची कमी केली आणि सर्व रचना बदलण्यात आली. ही उंची 75.7 मीटर केली. यामध्ये 7 मीटर उंची कमी केली गेली. 38 मीटर तलवार होती, ती 48 मीटर केली. यामुळे या स्मारकाची मूळ रचना बदलली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.