Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चौथी भाषा आणल्यास बांबूचे फटके - राज ठाकरे


मुंबई - भाजपाने टोलमुक्त महाराष्ट्र करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र राज्यात जे ७८ टोल बंद झाले ते फक्त मनसेने केलेल्या आंदोलनामुळे आणि दणक्यामुळे बंद झाले, असे सांगत मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न केला तर मनसे त्यांना बांबूचे फटके देईल, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह शिवसेना कार्यकर्त्याने वरळीत गुजराती, तमिळ भाषामधील पोस्टर्स लावले होते. मराठीचा कैवार घेणारा आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला गुजरातीमधून पोस्टर्स लावण्याची वेळ का आली, असे म्हणत सेनेवर सर्वच स्तरांतून सोशल मीडियात टीका झाली होती. सोशल मीडियावर टीका झाल्याने शिवसेनेवर अखेर ते पोस्टर्स काढण्याची नामुष्की आली होती. आज राज ठाकरे यांनी मराठी मुद्द्याला हात घालीत मुंबईत चौथी भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. मुंबईत, मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषा ठीक आहे. पण चौथी भाषा कुणी आणत असेल तर त्यांना बांबूचे फटके दिले जाईल, असे राज ठाकरे यांनी आज भांडूपमधील सभेत सांगितले. विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या मनसेने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत पहिली सभा झाली. पहिल्याच सभेच राज यांनी सत्ता मागण्याऐवजी राज्याला प्रबळ विरोधी पक्ष नेत्यांची गरज असून तुम्ही मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा, असे आवाहन मतदारांना केले होते.

काय म्हणाले राज ठाकरे -
>> प्रत्येक निवडणुकीत नागरिकांच्या आयुष्यातील ५ वर्ष जातात, निवडणुकीत वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात आणि पुढे लोकं विसरतात,
लोकं पण प्रश्न विचारत नाहीत आणि माध्यमं देखील सत्ताधाऱ्यांना आश्वासनाबद्दल एकही प्रश्न विचारायला तयार नाहीत.

>> गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण सरकारला त्याचं काही नाही, अमित शाह तर महाराष्ट्रातल्या एका सभेत शेतकऱ्यांवर बोलण्याऐवजी कलम ३७० वर बोलत होते आणि त्या सभेच्या शेजारच्या गावात त्याच वेळेला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

>> महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य हे आश्वासन होतं, काय झालं त्या आश्वासनाच? आधुनिक तंत्र वापरून खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढणार? कुठे गेलं तंत्रज्ञान? खड्डे पडत आहेत, कंत्राटदार कमवतोय, तरीही आपण प्रश्न विचारत नाही

>> काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी केलं, शेतकऱ्यांच्यात निराशा पसरली आहे असं भाजपने २०१४ च्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं. काय वेगळं घडलं, महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे, शेतकरी निराश आहे, तो आत्महत्या करतोय, काय बदल झाला?

>> एल्फिन्स्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन केलं त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला. पण पुन्हा तो परिसर सरकारी आशीर्वादाने फेरीवाल्यानी भरले. आंदोलनं आम्ही करायची, सरकार काहीच करणार नाही तरीही माध्यमं मला विचारणार की तुम्ही आंदोलनं अर्धवट सोडता?

>> नोटबंदीच्या दहाव्या दिवशी मी बोललो होतो की सरकारच्या ह्या निर्णयामुळे उद्योगधंदे बंद पडत जाणार, देशावर बेकारीचं सावट येणार.. आणि तसंच घडलं. बीपीसीएल रिलायन्सला द्यायचा घाट सुरु आहे, आहेत त्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत, ही वेळ आणली कोणी?

>> आणि अशा वेळेस सरकारला प्रश्न विचारायचा कोणी? असा हतबल महाराष्ट्र मी नाही बघू शकत? अटकेपार झेंडा नेणारा महाराष्ट्र आज गलितगात्र पडलाय, थंड झालाय. महाराष्ट्राला आसपासच्या घटनांचा राग का येत नाहीये? चीड का येत नाहीये कोणाला ?

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom