मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला आहे. सेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली आहे.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं आमदार तृप्ती सावंत यांना डावलून मुंबईचे विद्यमान महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्या विरोधात सावंत यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. शिवसेनेकडून त्यांची समजूत घालण्यात आली. मात्र, त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळं मतांची विभागणी होऊन काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांना लॉटरी लागली.
झिशान सिद्दिकी हे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आहेत. वांद्रे पश्चिमचे आमदार राहिलेल्या बाबा सिद्दिकी यांनी यावेळी निवडणूक न लढता मुलाला वांद्रे पूर्वमधून उभे केले होते. त्यांना शिवसेनेतील बंडखोरीचा फायदा झाला. सिद्दिकी यांना ३८३०९ मते मिळाली. तर, विश्वनाथ महाडेश्वर यांना ३२,४७६ मते मिळाली. बंडखोर सावंत यांनी तब्बल २४ हजार ३४ मते घेतली. एमआयएम व मनसेच्या उमेदवारांनीही इथं प्रत्येकी १० हजारांहून अधिक मतं घेतली.