महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधावा - संजय कुमार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2019

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधावा - संजय कुमार



मुंबई, दि. 21 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या काळात अनुयायाना शांततेत चैत्यभूमीला भेट देऊन अभिवादन करता यावे, यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे राज्य शासनाबरोबरच महानगरपालिका, बेस्ट, रेल्वे प्रशासन, एसटी महामंडळ आदींनी विविध सुविधा पुरविल्या आहेत. अनुयायांच्या सुरक्षेसाठी समुद्रात जास्तीचे जीवरक्षक तैनात करणे, बोटी तयार ठेवणे, महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॉफीटेबल बुकची ना नफा ना तोटा तत्वावर विक्री करणे, शिवाजी पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी)वतीने पुरविण्यात येणाऱ्या भोजन सेवेची व्याप्ती वाढविणे आदीसंदर्भात संजय कुमार यांनी योग्य ते निर्देश दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन संजय कुमार यांनी यावेळी केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदाही माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या वतीने शिवाजी पार्कवर तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील महाराष्ट्र शासन निर्मित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. त्याचबरोबर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रम व आकाशवाणीच्या ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. कांबळे यांनी सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केल्याचे सांगितले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रजनीश शेठ, सहपोलीस आयुक्त विरेश प्रभू, उपायुक्त प्रणय अशोक, रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त के.के. अश्रफ, महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Post Bottom Ad