महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी

Share This

नवी दिल्ली - महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारवरील विश्वासमताची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. लोकांना चांगलं सरकार मिळवण्याचा अधिकार आहे, असं मत न्यायमूर्ती रमन्ना यांनी मांडून महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा आदेश दिला. बहुमत चाचणीच्या पूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, तसंच मतदान हे गुप्त पद्धतीनं नको, असंही न्यायालयानं सांगितलं. उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आम्ही तिन्ही पक्ष समाधानी आहोत. बहुमत चाचणीआधीच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

न्यायालयाचे आदेश !
- महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच संध्याकाळी बहुमत परीक्षण घ्यावं.
- हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड करा.
- आमदारांच्या शपथविधीनंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी.
- गुप्त मतदान नको. बहुमत चाचणी प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं आणि हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेतील.
- लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. आतापर्यंत आमदारांचा शपथविधी झाला नाही. लोकांना चांगले सरकार मिळाले पाहिजे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages