मुंबई - राज्यातील आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झालं आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यांनी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे, असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज पहिलीच संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत कोणताही वाद-विवाद न होता किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. त्यामुळे महाआघाडीचं नवं सरकार राज्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची मागणी केलेली नाही. त्याबद्दल आमची आमच्या हायकमांडशी चर्चा झालेली नाही. काँग्रेसला मुख्यमंत्रिपद हवंय ही निव्वळ अफवा आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच सत्तावाटपाचं ठरणार आहे, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
'मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत यायचंच नाही, तर मागण्या कुठून समोर यायला लागल्या? मला नाही वाटत. त्यांना तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत यावं. पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दिवसात कोणताही वाद होणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. मलिक यांच्या वक्तव्यामुळे राज्यात शिवसेनेचा पाच वर्षासाठी मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याचंही स्पष्ट झाले आहे.