Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांना ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार'


नवी दिल्ली, 21 : मुंबईच्या परळ भागातील झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्हयातील आकाश खिल्लारे याला यंदाचा (वर्ष 2019) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. देशाच्या 12 राज्यांतील 22 बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांचा समावेश आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष गीता सिध्दार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुंबईच्या परळ भागातील राहत्या इमारतीत आग लागून झालेल्या घटनेत झेन सदावर्ते या 10 वर्षाच्या मुलीने 17 जणांचे प्राण वाचविले. झेन राहत असलेल्या 17 माळयांच्या इमारतीला अचानक आग लागली 16 व्या माळाव्यार राहणा-या झेनच्या कुटुंबियांना आग लागल्याचे कळताच तिच्या आई वडिलांनी तिला झोपेतून उठवले. झेनने स्वयंपाकघराची खिडकी उघडताच संपूर्ण घरात धूर पसरला अशातच शेजारून काही लोकांनी दिलेल्या ‘वाचवा- वाचवा’च्या आरोळया तिच्या कानावर पडताच ती घराबाहेर आली आणि आवाजाच्या दिशेने धावली. आगीच्या विळख्यात सापडलेल्या या लोकांना धिर देत झेनने सुरक्षित स्थळी सर्वांना हलविले. यावेळी तिने या माळयावरील विजेचा मेन स्वीच बंद केला व अग्नीशमन दलालाही फोन केला. दरम्यान, आपत्तीकाळात स्वसंरक्षणासाठी शाळेत शिकविलेले उपाय प्रत्यक्षात आणत झेन ने या सर्वांना आपल्याकडील विशिष्ट मास्क दिले व एकाच ठिकाणी सर्वांना खाली बसविले. यानंतर अग्नीशमन दलाची गाडी येवून झेनसह आगीत अडकलेल्या 17 जणांना सुरक्षीत बाहेर काढले. झेनच्या प्रसंगावधानाने व धाडसामुळे 17 जणांचे प्राण वाचले तिच्या या साहसाकरिता ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार ‘जाहीर झाला आहे.

औरंगाबाद जिल्हयातील आकाश खिल्लारे ने ‘माय लेकींना' नदित बुडण्यापासून वाचविले आहे. गावातील शाळे शेजारून जात असताना जिवाच्या आकांताने 'वाचवा-वाचवा' असा आवाज आकाशच्या कानावर आला. त्याने प्रसंगावधान राखत आवाजाच्या दिशेने धाव घेतली. शेजारील दुधना नदीत एक महिला बुडत असल्याचे त्याने बघितले आजुबाजुला कोणी मदतीला नाही हे पाहताच आकाशने या महिलेला वाचविण्यासाठी 70 फुट खोल नदीत उडी मारली. जेव्हा आकाश महिलेला बाहेर काढण्यासाठी गेला तेव्हा, तिथे त्या महिलेची लहान मुलगीही बुडत असल्याचे त्याने पाहिले. त्याने मुलीला सुरक्षितरित्या बाहेर काढले व पुन्हा नदित उडी घेत महिलेलाही सुरक्षित बाहेर काढले. आकाशने प्रसंगावधान राखत व धाडसाचा परिचय देत या मायलेकींचा प्राण वाचविल्याबद्दल त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

झेन आणि आकाश यांच्या साहसाची नोंद घेत त्यांना देशातील सर्वोच्च बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

10 मुली आणि 12 मुले अशा एकूण 22 बालकांना वर्ष 2019 च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. यामध्ये एका बालकाला मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सहा श्रेणींमध्ये देण्यात येणा-या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom