भाजपाला ७४२ कोटी, काँग्रेसला १४८ कोटी रुपयांच्या देणग्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपाला ७४२ कोटी, काँग्रेसला १४८ कोटी रुपयांच्या देणग्या

Share This

नवी दिल्ली : भाजपाला २०१८-१९ या वर्षात देणग्यांच्या स्वरूपात तब्बल ७४२ कोटी रुपये, तर काँग्रेसला यादरम्यान फक्त १४८ कोटी रुपये मिळाल्याची माहिती या दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भाजपाला २०१७-१८ या वर्षात ४३७.०४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. २०१८-१९ या वर्षात भाजपाच्या देणग्यांमध्ये वाढ होऊन त्या ७४२.१५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या. त्यानुसार भाजपाच्या देणग्यांमध्ये ७० टक्के वाढ झाली.

काँग्रेसला २०१७-१८ मध्ये २६ कोटींच्या देणग्या मिळाल्या होत्या. २०१८-१९ मध्ये हा आकडा १४८.५८ कोटींवर पोहोचला. म्हणजेच काँग्रेसच्या देणग्यांमध्ये ४५७ टक्क्यांची वाढ झाली. यापूर्वी २०१६-१७ ते २०१७-१८ या वर्षात भाजपाच्या देणग्यांमध्ये ३६ टक्क्यांनी घट झाली होती. ४४८३ देणगीदारांनी दिलेल्या देणग्यांमधून ७४२.१५ कोटी रुपये मिळाल्याची घोषणा भाजपाकडून करण्यात आली. ६०५ लोकांनी दिलेल्या फंडातून १४८.५८ कोटी रुपये देणग्या मिळाल्याची घोषणा काँग्रेसने केली. एडीआरनुसार भाजपाला मिळालेल्या देणग्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, माकप व तृणमूल काँग्रेस या सर्व पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांपेक्षा तीनपट अधिक आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages