बारावी 23 एप्रिल तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल पासून - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2021

बारावी 23 एप्रिल तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल पासून



मुंबई, दि. 21 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी ची लेखी परीक्षा दिनांक 23 एप्रिल तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) ची लेखी परीक्षा दिनांक 29 एप्रिल पासून सुरु होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षामंडळ संचालक दिनकर पाटील उपस्थित होते.

प्रा. गायकवाड पुढे म्हणाल्या, इयत्ता 12 वी ची प्रात्यक्षिक परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान होईल तर लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान होतील तर लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येतील. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

राज्यात इ. 9 वी ते इ.12 वी च्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून दि.18 जानेवारी 2021 रोजी 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत व 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेऊन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad