
कोईंबतूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निपाह विषाणूचा एक रुग्ण सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. तसेच तीव्र तापाचे जे रुग्ण सरकारी रुग्णालयात येतील, त्यांची योग्य पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.
निपाह विषाणूच्या संसर्गामुळे रविवारी १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली होती. केरळमधील कोझिकोडे येथील एका खासगी रुग्णालयात या मुलावरच उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान, त्याचा मृत्यू झाला. केरळसाटी चिंतेची बाब म्हणजे राज्यातील कोरोना विषाणूची साथ अद्याप नियंत्रणात आलेली नाही. सध्या देशात सापडत असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण एकट्या केरळमध्ये सापडत आहेत. तसेच एकट्या केरळमध्ये सध्या कोरोनाचे दोन लाख सक्रिय रुग्ण आहेत.
निपाह विषाणू सर्वप्रथम १९९८ मध्ये मलेशियामध्ये सापडला होता. २००१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये निपाहचे काही रुग्ण सापडले होते. निपाह विषाणू हा सुद्धा कोरोना विषाणूप्रमाणे धोकादायक आहे, मात्र तो हवेतून पसरत नाही. निपाह विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये पसरतो. त्याचे मूळ कारण वटवाघळे हेच आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत माणसांमधून माणसांमध्ये या विषाणूचा फैलाव होण्याची भीती अधिक आहे. त्याशिवाय डुक्करांमधूनही निपाह विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. तीव्र ताप हे निपाह विषाणूचे लक्षण आहे. हा ताप दोन आठवड्यांपर्यंत राहतो. चिंतेची बाब म्हणजे या विषाणूमुळे कुठल्याही व्यक्तीच्या मेंदूवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق