Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

No titleमुंबई - वाङमयीन परिवर्तनवादी चळवळीत अग्रेसर रहात, सातत्यपूर्ण रचनात्मक कार्यक्रम करून मराठी वाङमयीन क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करणार्‍या सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध लेखिका, आयदानकार उर्मिला पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

परिवर्तनवादी कवितेचे जनक आ. सो. शेवरे यांचे २६ आॅक्टोबर २०१६ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी वाङमयीन व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या एका साहित्यिकाला आ. सो. शेवरे यांच्या नावे जीवनगौरव पुरस्कार देण्याचे कार्य सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या संस्थेने सुरु केले आहे. यापूर्वी आंबेडकरवादी विचारवंत, कुशल नेतृत्वगुण असणारे, दलित पॅंथरचे संस्थापक, नेते राजा ढाले व ज. वी.पवार यांना हा पुरस्कार शेवरेंच्या स्मृतीदिनी घोषित करण्यात आला होता.

आ. सो. शेवरे यांचे कोकणातील विद्रोही, पुरोगामी वाङमयीन व सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण ठरले अाहे. आंबेडकरी चळवळीचा प्रचार व प्रसार करताना नवी प‍ालवी बहरूनी यावी या ध्येयापोटी त्यांनी 'प्रसंवाद' या अनियतकालिकाची निर्मिती केली. याद्वारे त्यांनी नव्या लिहित्या हातांतील उपजत कौशल्य ओळखून त्याला प्रसंवाद अनियतकालिकात संधी दिली. त्य‍ानंतर सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापना करून वाङमयीन कार्यक्रमांना आंबेडकरी अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांचे 'गंधारीची फुले', 'दफनवेणा' व 'झीरो बॅलन्स असलेलं माझं प‍ासबुक' इ. कवितासंग्रह प्रसिद्ध असून वाङमयीन क्षेत्र‍ातील बा. सी. मर्ढेकर, श्रीपाद काळे व अस्मितादर्श इ. महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच हेतकर्स पब्लिकेशनद्वारे त्यांच्या समग्र वाङमयीन वाटचाल व चरित्रपर 'आ. सो. शेवरे: व्यक्ती आणि वाङमय' हा सुनील हेतकर संपादित महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. शेवरेंनी केलेल्या कार्याच्या स्मृती जतन व्हाव्यात, म्हणून सम्यक साहित्य संसद या संस्थेतर्फे आ.सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरुप ₹ १०,०००, सन्मानपत्र, शाल व सन्मानचिन्ह असून शेवरे य‍ांच्या ५व्या स्मृतिदिनी झालेल्या कार्यकारिणी सभेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

उर्मिला पवार या स्त्रीमुक्ती चळवळीतील अग्रगण्य लेखिका/ कार्यकर्त्यां असून त्यांचे विविध वाङमयीन प्रकारातील साहित्य प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये 'सहावं बोट' (१९८८), 'चौथी भिंत' (१९८९) व 'ह‍ातचा एक' (२००४) इ. कथासंग्रहांचा समावेश आहे. बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित कथा 'उदान' (१९८९) या भ‍ाषातंराने त्यांना नावलौकिक मिळवून दिला. आंबेडकरी चळवळीत स्त्रियांनी दिलेल्या योगदानाविषयी 'आम्हीही इतिहास घडविला' (१९८९) या संशोधनपर लेखनाशिवाय 'माॅरिशस एक प्रवास' (१९९४) हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध आहे. आयदान (२००३) हे आत्मकथन मैलाचा दगड ठरले. या आत्मकथनाचे इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलुगू भाषेत अनुवाद झाले आहेत. शिवाय महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही याचा समावेश करण्यात आला आहे. 'दलित लेखिका आणि त्याचं साहित्य' (२०१०) व 'कोकणातील दलित‍‍‍ांचे रीतिरिवाज आणि लोकगीते इ. महत्त्वपूर्ण ग्रंथही प्रसिद्ध असून यातील बहुतेक साहित्यकृतींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. 'सहावं बोट' (१९८९) या कथ‍ासंग्रहाला प्राप्त झालेला साहित्य संस्कृती मंडळाचा शासकीय पुरस्कार २०१५ मध्ये त्य‍ांनी शासनाला परत केला. त्यांना संगमनेर, चंद्रपूर, धुळे येथे संपन्न झालेल्या साहित्यसंमेलानच्या अध्यक्षा म्हणूनही बहुमान प्राप्त झाला आहे. अशा या त्यांच्या वाङमयीन क्षेत्रातील चतुरस्र कामगिरीची दखल घेत आयद‍ानकार उर्मिला पवार य‍‍ांना आ.सो.शेवरे जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला जात असून या पुरस्काराने त्यांना लवकरच सन्मानित करण्यात येईल अशी माहिती संस्थाध्यक्ष सुनील हेतकर व कार्यवाह सिद्धार्थ तांबे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom