
बाबा रामदेव ही समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्यांचा समाजावर मोठा प्रभाव आहे. बाबा रामदेव केवळ कोरोना लसीकरणावर नाही, तर अॅलोपॅथी उपचारांवरही संशय व्यक्त करत आहे आणि हे चुकीचे आहे, असा दावा दिल्ली मेडिकल असोसिएशनकडून या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्या. सी. हरिशंकर यांनी म्हटले की, या याचिकेत लावण्यात आलेल्या आरोपांवर विचार केला जाऊ शकतो, असे सांगत याचिका सुनावणीस दाखल करून घेतली.
आरोप योग्य असू शकतात किंवा चुकीचे असू शकतात. आरोप करण्यात आलेली व्यक्ती आरोपांचे खंडनही करू शकते. तसेच असे काहीच म्हटले नव्हते, असाही दावा करू शकते. मात्र, या याचिकेतील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे याचिकेवर सुनावणी सुरू ठेवणे आवश्यक आहे. अशाच कोणत्याही ठोस कारणाशिवाय याचिका रद्द किंवा बाद करू शकत नाही, असे मत न्यायालयाने यावेळी नोंदवले आहे.
बाबा रामदेव जनतेची दिशाभूल करत आहेत. कोरोना संसर्ग झालेल्या अनेकांच्या मृत्यूसाठी अॅलोपॅथी उपचार पद्धती जबाबदार होती. तसेच कोरोनावर कोरोनिल प्रभावी असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. कोरोनिलसाठी त्यांनी अशा प्रकारचे निराधार आरोप केले. कोरोनिल रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र, दिलेल्या परवान्याशी तो फारकत घेणारा तसेच विरुद्ध होता, असे चिकित्सक संघाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, बाबा रामदेव यांची विधाने मार्केटिंग आणि व्यवसायिक लाभाच्या संदर्भात होती, असे न्यायालयाला सांगण्यात आले. यापूर्वी, दिल्ली मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या या याचिकेवर उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना समन्स बजावून आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق