विधान परिषदेवर मुंबईतून राजहंस सिंह, सुनिल शिंदे बिनविरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2021

विधान परिषदेवर मुंबईतून राजहंस सिंह, सुनिल शिंदे बिनविरोध



मुंबई - मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर दोन जागांवर शिवसेनेचे सुनील शिंदे व भाजपचे राजहंस सिंह यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस समर्थक सुरेश कोपरकर यांनी अर्ज मागे घेतल्याने हे हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहिर केले.

मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठी सुनील शिंदे, राजहंस सिंह यांच्याबरोबरच काँग्रेस समर्थक उमेदवार सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता होती. मात्र कोपरकर यांनी गुरुवारी अर्ज मागे घेतल्याने या दोघांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तिसरा उमेदवार नसल्याने निवडणूक आयोगाकडून त्याच्या विजयाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.

सुनील शिंदे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ते मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवकही आहेत. शिवाय बेस्ट समितीचे ते अध्यक्षही होते. आदित्य ठाकरे यांनी विधान सभेच्या निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याने त्यांनी आमदारकीवर पाणी सोडले होते. मात्र त्यांच्या त्यागाची भरपाई विधान परिषदेच्या उमेदवारीतून करण्यात आली. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या विजयाने शिवसेनेला पालिका निवडणुकीत बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर भारतीयांच्या मतांचा होणार फायदा -
भाजपचे राजहंस सिंह यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. भाजपमध्ये आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले. पुढील वर्षी म्हणजे तीन महिन्यानंततर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय व्होटबँक भाजपकडे वळविण्यासाठी राजहंस सिंह यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad