महाराणा प्रताप यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 January 2022

महाराणा प्रताप यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई - महाराणा प्रताप यांचे भारताच्या इतिहासात अजरामर स्थान आहे. त्यांचा स्वाभिमानी बाणा, शूर पराक्रमाने मातृभूमीचे रक्षण हे कार्य कधीही विसरले जाऊ शकत नाही. तेजाभिमानी राजा महाराणा प्रताप यांचा केवळ पुतळा उभारुन न थांबता त्यांचा तेजस्वी विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. (It is the responsibility of all of us to carry forward the legacy of Maharana Pratap - Chief Minister Uddhav Thackeray)

तेजाभिमानी राजा म्हणून इतिहासात अजरामर नोंद झालेले महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ भव्य पुतळा माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आला आहे. तसेच महाराणा प्रताप चौकाचे संपूर्ण सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. या पुतळ्याचे अनावरण आणि चौक सुशोभीकरणाचे लोर्कापण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज (दिनांक २३ जानेवारी २०२२) सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले, त्यावेळी ते संबोधित करत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून महाराणा प्रताप यांच्या या पुतळ्याचे अनावरण करण्याची प्रतीक्षा होती. योगायोगाने आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले. इतिहासात शिवरायांसोबत शूर मावळे होते, महाराणा प्रताप यांच्यासोबत शूर सैनिक होतेच. पण या महान राजांचे कर्तृत्व थोर आणि नेतृत्व दूरदृष्टीचे व प्रेरणादायी होते, म्हणून त्यांनी मातृभूमीचे रक्षण प्राणपणाले करुन दाखवले. आजही त्यांचे पुतळे उभारुन स्मरण केले जाते. नेमका कोणाचा वारसा आपण चालवत आहोत, कोणता आदर्श पुढे न्यायचा आहे, याची आठवण देण्याचे कार्य या पुतळ्याच्या उभारणीतून झाले आहे. महाराणा प्रताप यांच्या चेतक या अश्वाची ओळख त्यांचा जीवलग सवंगडी अशीच होती. युद्धात रक्तबंबाळ जखमी असतानाही या चेतकने महाराणा प्रताप यांना सुरक्षित नेण्याची कामगिरी पार पाडली आणि नंतर त्याने प्राण सोडले. या निष्ठावान चेतक अश्वाइतकी कामगिरी तरी आपल्याला करता आली पाहिजे. तेजाचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे मुख्यमंत्री महोदयांनी नमूद केले. तसेच महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासह महाराणा प्रताप चौकाचे सुशोभीकरण उत्कृष्ट रितीने केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे जाहीरपणे कौतुकही केले.

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याची कोनशिला अनावरण तसेच संविधान उद्देशिका अनावरण देखील करण्यात आले. त्यानंतर कमलाकर गनू जाधव चौकाचे नामफलक अनावरण देखील पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. 

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. यावेळी स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार यामिनी यशवंत जाधव, आमदार सुनील शिंदे, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेता  विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक यशवंत जाधव, माजी मंत्री सचिन अहिर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, ए, बी व ई प्रभाग समितीचे अध्यक्ष रमाकांत रहाटे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीवकुमार, माजी महापौर तथा नगरसेविका स्नेहल आंबेकर, स्थानिक नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर, ई विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर, पुतळ्याचे शिल्पकार सरमद पाटील हे मान्यवर प्रत्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याबाबत -
* प्रत्येक भारतीय योद्ध्यासाठी प्रेरणेचा मानबिंदू असणाऱया महाराणा प्रताप यांचा दक्षिण मुंबईत पुतळा उभारला गेला आहे.

* दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात प्रभाग क्रमांक २०९ मध्ये महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांचा हा भव्य आणि अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.

* स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनात दिनांक २३ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराणा प्रताप चौकाचे सुशोभिकरण व महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले.

*  हा चौक नेस्बिट मार्ग आणि शिवदास चापसी मार्ग जंक्शनवर स्थित आहे, जे मुळात वाहतूक बेट आहे व इतर पाच वाहतूक बेटाने वेढलेले आहे.

* चौकाचे सुशोभिकरण आणि महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापित करण्याच्या प्रस्तावाला दिनांक ५ मार्च २०१९ रोजी मंजुरी मिळाली.

* धुळे येथील शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी महाराणा प्रताप यांचा हा पुतळा साकारला आहे. दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजी हा पुतळा मुंबईत आणण्यात आला.

* २० फूट उंचीच्या चौथ-यावर, १६ फूट उंचीचा हा भव्य पुतळा स्थापित करण्यात आला आहे. साडेचार टन वजनी आणि कांस्याने बनविलेला हा पुतळा भालाधारी व अश्वारूढ आहे. 

* पुतळा उभारताना संपूर्ण चौकाचे नावीन्यपूर्ण पद्धतीने सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. या ठिकाणी चौकाला शोभेल अशी आकर्षक विद्युत रोशणाई देखील करण्यात आली आहे. 

* वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना बेस्ट बसस्थानकाजवळील एका बेटावर जुने कारंजे आढळून आले. त्याचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. 

• महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित विविध भित्तिशिल्प आजूबाजूच्या त्रिकोणी बेटांवर लावण्यात आले आहेत. तसेच चौक परिसरातील रस्ते सुधारणा देखील करण्यात आली आहे.
 
* महानगरपालिकेचे विविध खाते, ई विभाग कार्यालय, बेस्ट प्राधिकरण आदींच्या समन्वयासह आणि शासनाच्या पुतळा समितीची विहित परवानगी प्राप्त करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad