मुंबई - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांच्या मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झाला आहे. स्थायी समितीत येणा-या प्रस्तावातील त्रूटीवर बोट ठेवत भाजपकडून तीव्र विरोध केला जातो आहे. शुक्रवारी स्थायी समितीत बीपीटीसीच्या फंडातून केल्या जाणा-या रस्ते, पदपथाच्या प्रस्तावावर बोलू न दिल्याने भाजपने संताप व्यक्त करीत स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या मांडून आंदोलन केले. याला जशास तसे उत्तर देत शिवसेनेनेही घोषणाबाजी सुरु करीत आमने- सामने आले. जवळपास पाऊनतास सुरु असलेल्या या आंदोलना दरम्यान एकमेकांविरोधातील घोषणांनी पालिका परिसर दणाणून गेला.
स्थायी समितीत विविध विकास कामांवर कोट्यवधी रुपयाचे प्रस्ताव मंजुरीसाठी येतात. गेल्या काही स्थायी समितीत महत्वाच्या प्रस्तावावर स्थायी समितीत अध्यक्ष यशवंत जाधव बोलूच देत नाहीत. प्रस्तावावर आक्षेप असतानाही चर्चा न करताच प्रस्ताव मंजुरी केले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो आहे. गेल्य़ा काही स्थायी समितीत विद्यार्थ्यांसाठी टॅब, मास्क खरेदी, जंबो कोविड सेंटर खर्च, ऑक्सिजन प्लांट उभारणी, भंगार विक्री, आश्रय योजना, पेंग्विन देखभाल, नालेसफाई, वीर जिजामाता उद्यान विकास, बेस्ट डिजिटल तिकीट निविदा, मिठी, पोईसर नदी आदी विकासकामांच्या प्रस्तावावर भाजपा सदस्यांना बोलू दिले नाही. या प्रस्तावांत अनेक संशयास्पद त्रूटी, अनियमितता असल्याने त्यावर भाजपने विरोध केला, मात्र स्थायी समिती अध्यक्षांनी बोलू न देता प्रस्ताव मंजूर केले. त्यावेळी भाजपने तीव्र विरोध करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शुक्रवारी स्थायी समितीत बीपीटीसीच्या फंडातून रस्ते, पदपथ सुशोभिकरण कामांचे प्रस्ताव स्थायी समितीत आले असता त्यात अनियमितता असल्याने भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना बोलू दिले नाही व प्रस्ताव घाईघाईने मंजूर केला असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ अध्यक्षांच्या दालनासमोर भाजपने धरणे आंदोलने केली. स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु असताना शिवसेनेचे नगरसेवकही आमने -सामने येत घोषणाबाजी सुरु केली. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी, आरोप- प्रत्यारोप करीत जोरदार खडाजंगी झाली.
अनेक प्रस्तावामध्ये अनियमितता तसेच भ्रष्टाचार असून त्यावर आक्षेप घेतल्यास स्थायी समिती अध्यक्षाकडून मुस्कटदाबी केली जाते. यासाठी याआधीच आम्ही स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. आमचा विकास कामांना विरोध नसून त्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत कार्यक्रम पत्रिकेवरील मुंबई शहरासंबंधी असलेल्या विविध प्रश्नांवर बोलण्याची परवानगी विरोधकांना दिली पाहिजे. भारतीय राज्य घटनेच्या कलम १९ अन्वये मूलभूत अधिकार म्हणून स्थायी समितीत ज्या सदस्यांना बोलण्याची इच्छा आहे, त्यांना परवानगी देणे आवश्यक आहे. मुंबईकरांच्या हिताचे निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतले जातात. स्थायी समिती अध्यक्षांकडून अनेक प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत, असे भाजपचे गटनेते शिंदे यांनी सांगितले.
स्थायी समितीतील मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात प्रसंगी जनतेच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला. यावेळी स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, राजेश्री शिरवाडकर, कमलेश यादव, मकरंद नार्वेकर, विद्यार्थी सिह, हरीश भांदिर्गे यांनी निदर्शने केली.
भाजपचे आरोप खोटे, दिशाभूल करणारे
भाजप प्रत्येक विषयावर दिशाभूल करणारे आरोप करून गोंधळ घालतात. प्रत्येक बैठकीत भाजपला बोलू दिले जाते. मागील तीन महिन्याच्या स्थायी समितीत सर्वात जास्त भाजपच्या सदस्य़ांना बोलायला दिले आहे. भाजप करीत असलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. भाजपकडे मुद्दाच राहिलेला नाही. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आरोप केले जात आहेत. मात्र शिवसेनाही जशास तसे उत्तर देईल.
- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष
No comments:
Post a Comment