मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट - ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2022

मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट - ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफमुंबई - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली आहे. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर करून त्यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. दरम्यान करमाफ केल्याने मुंबई महापालिकेला दरवर्षी ४८५ कोटीच्या महसूलावर पाणी सोडावे लागणार आहे. 

शिवसेनेने २०१७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नव्हती. मुंबईकरांना येणाऱ्या मालमत्ता करात एकूण १० करांचा समावेश आहे. त्यापैकी १ कर माफ करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ४८५ कोटींचा भार पडणार होता. मात्र यामुळे शिवसेनेने निवडणुकी दरम्य़ान मुंबईकरांची फसवणूक केल्याची ओरड त्यावेळी होत होती. मात्र आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने सर्वच कर माफ केले आहेत. त्यामुळे शिवसेनेने वचनपूर्ती केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या निर्णयाचा भार मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर पडणार असून आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी पहिल्यांदाच समाज माध्यमांद्वारे जनतेसमोर आले. नगरविकास खात्याची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक होती, त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधला. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे आदी वरिष्ठाधिकारी उपस्थित होते.

विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानीही मुंबईतील ५०० चौरसफुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबद्दल महापालिकेचा प्रस्ताव आला आहे आणि त्याबद्दल काम देखील सुरू आहे, अशी माहिती दिली होती. मात्र करमाफीवरील काम पूर्ण करून शनिवारी बैठकीत त्यांनी घोषणा केली.

जमेल तेच वचन -
मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळते हा खरा प्रश्न आहे. मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना असे अजिबात करत नाहीत. जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, ही शिवसेनेची परंपरा आपण पुढे नेत आहोत. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहुतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विरोधकांवर हल्लाबोल -
जर एखादे काम आपण केले तर त्याची जाहिरात करायची हे मला स्वतःला पटत नाही. राजकारणात काही केले तर भ्रष्टाचार केला असे म्हणतात. आणि काही नाही केले तर काहीच नाही केले असे म्हटले जाते. अनेक जण वाटेल ते सांगतात, आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावरती उड्डाणपूल बांधून देऊ. ज्या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या ते सांगतात. लोक फसतात आणि मते देऊन मोकळी होतात. मग पाच वर्ष काही बोलायचे नाही. तुम्ही बोलला होतात आम्ही तारे तोडून आणू, निवडणुकीत असे बोलावे लागते, असे मग सांगितले जाते. मग लोक त्यांनाच तारे दाखवतात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

सर्वात मोठी भेट - एकनाथ शिंदे
मुंबईकरांचा ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून १६ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल. मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असून नवीन वर्षाचे मोठी भेट आहे असे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ असून रुग्णालयात असूनही कोविड रोखण्यासाठीचे काम आणि इतर कामांच्या प्रगतीविषयी मुख्यमंत्री वारंवार विचारायचे. शिवसेना दिलेल्या वचनाला जागते, दिलेला शब्द पाळते. कोविड काळात देखील विकास कामांना कात्री लावली नाही असेही ते म्हणाले.

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून आभार -
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की , मी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांचे आणि नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा निश्चितच एक क्रांतिकारी निर्णय असून लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील या महत्वाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages