बँक इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा गुजरातमध्ये, २८ बँकांना २२,८४२ कोटींचा चुना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2022

बँक इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा गुजरातमध्ये, २८ बँकांना २२,८४२ कोटींचा चुना


गुजरात / सुरत : बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला असून, एबीजी शिपयार्डने तब्बल २८ बँकांना २२,८४२ कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने एबीजी शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Bigest bank scam in gujrat)

एबीजी शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. एबीजी शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.

नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा -
एसबीआयच्या डीजीएमने गुजरातमधील अनेक कंपन्यावर २२८४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. हा घोटाळा आतापर्यंतच्या बँक घोटाळ्यातील सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. कारण हा घोटाळा नीरव मोदींपेक्षाही मोठा आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनेशनल या घोटाळा करणा-या दोन प्रमुख कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या एकाच ग्रुपच्या आहेत.

अनेक बँकांमध्ये केली फसवणूक -
एबीजी शिपयार्ड कंपनीने सर्व नियम तोडत अनेक बँकांमध्ये फसवणूक केली आहे. फक्त बँकच नाही तर एलआयसीलाही चूना लावला आहे. एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्डने एलआयसीची १३६ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर एसबीआयला २४६८ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. हा पैसा विदेशात पाठवल्याचा आणि गुंतवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. नियमांना तोडत एका कंपनीतून दुस-या कंपनीला पैसे पाठवले आहेत.

अशी आहे फसवणुकीची रक्कम
एसबीआयने केलेल्या तक्रारीनुसार, शिपयार्ड कंपनीने एसबीआय बँकेचे ७०८९ कोटी, आयडीबीआय बँकेचे ३६३४ कोटी रुपये, बँक ऑफ बडोद्याचे १६१४ कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेचे १२४४ कोटी रुपये आणि १२२८ कोटी रुपये इंडियन ओवरसीज बँकेकडून घेतले आहेत. याआधी ८ नोव्हेंबर २०१९ रोजी बँकेकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर सीबीआयने १२ मार्च २०२० रोजी स्पष्टीकरण मागवले होते. ऑगस्ट २०२० मध्ये बँकेकडून आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. जवळपास दीड वर्षांपेक्षा जास्त तपास केल्यानंतर सात फेब्रुवारी २०२२ रोजी सीबीआयने कारवाई सुरु केली.

हे आहेत आरोपी -
सीबीआयने ऋषी कमलेश अग्रवाल यांच्याशिवाय संथानम मुथास्वामी, अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल, रवी विमल नेवेतिया आणि अन्य एकाविरोधात गुन्हेगारी कट, फसवणूक, गुन्हेगारी विश्वासाचा भंग आणि अधिकृत गैरवर्तन यासारख्या गुन्ह्यांसाठी खटला दाखल केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad