पालिकेच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात "फुप्फुस पुनर्वसन केंद्र" - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 February 2022

पालिकेच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात "फुप्फुस पुनर्वसन केंद्र"



मुंबई - क्षयरुग्णांना आणि श्वसनाशी संबंधित विकारांमधून सावरण्यासाठी इतरही रुग्णांना उपचार पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयात ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी शिवडी येथील क्षयरोग उपचार रुग्णालयात पहिले फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. (Bmc Pulmonary Rehabilitation Center) 

महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांच्या हस्ते कांदिवलीतील ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ कार्यान्वित करण्यात आले. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थिती लावली. मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे यांच्यासह राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. मंगला गोमारे यांनी नमूद केले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष व सर्वोत्कृष्ट अशा आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. शिवडी येथील क्षयरोग उपचार रुग्णालयात दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईतील पहिले असे ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ सुरु करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता कांदिवलीत केंद्र सुरु केल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे. या फुप्फुस पुनर्वसन केंद्रासाठी सिप्ला फाऊंडेशन यांनी संयंत्र पुरविण्यासाठी मदत दिली आहे तर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुंबईकर नागरिकांचे हित लक्षात घेता, उपनगरीय रुग्णालयांमध्ये शक्य तिथे क्षयरुग्णांना उपचारांच्या सुविधा पुरविल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. विद्या ठाकूर यांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कार्यरत तसेच कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालय अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱयांचे सदर केंद्र सुरु केल्याबद्दल अभिनंदन केले.

कांदिवलीतील ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ हे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरु राहणार आहे. या केंद्राद्वारे श्वसनाशी संबंधित सर्व विकारांसाठी आवश्यक पुनर्वसन उपचार विनामूल्य दिले जाणार आहेत. यामध्ये फॉलो-अपसाठी येणाऱया रुग्णांसह क्षयरोगातून बरे झालेले रुग्ण, गंभीर स्वरुपाच्या फुप्फुस आजाराचे रुग्ण, दमा, सूक्ष्म श्वासनलिकेचे रुग्ण, फुप्फुसांना भेगा पडल्याने त्रस्त झालेले रुग्ण, कोविडमधून बरे झालेले रुग्ण अशा विविध प्रकारच्या रुग्णांना फुप्फुस पुनर्वसनाशी संबंधित उपचार घेता येतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad