संसद हे कायदेमंडळ, राजकीय सभेचा आखाडा नाही - बाळासाहेब थोरातमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत शनिवारी भाषण करताना काँग्रेसवर टिका केली आहे. याचे पडसाद देशभर उमटत आहे. याबाबत बोलताना संसद हे कायदेमंडळ आहे, तो राजकीय सभेचा आखाडा नाही. बहुदा पंतप्रधान हे विसरले असावेत असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. 

पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधानांनी मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या ६० मिनिटांच्या भाषणात आदरणीय मोदींनी किमान ५० वेळा काँग्रेसचा गजर करून एका अर्थाने काँग्रेसचा प्रचारच केला. खोटा इतिहास सांगून मते मिळविण्याचा आदरणीय पंतप्रधानांचा हा केविलवाणा प्रयत्न होता असे थोरात म्हणाले. 

लता दीदी यांनी आपल्या दैवी सुरांनी अखिल मानवजातीला आनंद दिला. आज लतादीदींच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांच्या नावाचा वापर आदरणीय पंतप्रधानांनी राजकारणासाठी सुरू केला हे वेदनादायक आहे. काँग्रेसने कायमच आदरणीय लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांचा सन्मान केला आहे. पंडितजी, इंदिराजी आणि अगदी सोनियाजी देखील लतादीदींच्या कलेच्या चाहत्या आहेत. मंगेशकर कुटुंबीयांनी केलेली कलेची उपासना वादातीत आहे. तुमच्या आमच्या राजकारणाच्या पलीकडची आहे.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर लतादीदींनी गायलेले ए मेरे वतन के लोगो हे गीत अजरामर झाले. पद्मभूषण, उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार, राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावर चा जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार असे अनेक सन्मान देऊन जेव्हा देशाने लतादीदींचा गौरव केला तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सरकारे होती. काँग्रेसने कधीच या पुरस्कारांचा राजकीय वापर केला नाही, कारण तो कलेचा सन्मान होता.

खरे तर काँग्रेस निरपेक्ष भावनेने काम करते. देशाच्या उभारणीत काँग्रेसचे योगदान वादातीत आहे. काँग्रेसने अशा गोष्टींचा वापर राजकारणासाठी कधीच केला नाही. गेली पन्नास वर्ष मी देशाचे राजकारण जवळून बघतो आहे, त्यात प्रत्यक्ष सहभागी आहे. पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने नेहमी संसद भवन आणि लाल किल्ल्यावरून राजकीय सभेतील भाषण करू नये अशी अपेक्षा आहे, हे देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी आवश्यक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

Post a Comment

0 Comments