बांधकामांनी अडलेले वांद्रयातील रस्ते घेणार मोकळा श्वास ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2022

बांधकामांनी अडलेले वांद्रयातील रस्ते घेणार मोकळा श्वास !मुंबई - गेल्या काही वर्षांपासून विविध बांधकामांच्या समस्येत अडलेले वांद्रे पश्चिम परिसरातील रस्ते आता मोकळा श्वास घेणार आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पाली हिल रोड आणि ऑफ पिटर डायस या मार्गांचे पहिल्या टप्प्यात रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी या मार्गातील बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने बिल्डरांकडून अर्ज मागविले आहेत.

मुंबईच्या २०१४-२०३४ च्या विकास आराखड्यात विविध भागातील विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. वांद्रे पश्‍चिम येथील प्रस्तावित रुंदीकरण असलेल्या रस्त्यांची यादी प्रभाग कार्यालयाने तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात तीन रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात केले जाणार आहे. या रस्त्यांवर सुमारे ७१ बांधकामे आहेत. तेथील रहिवाशांचे वांद्रे एच/पश्चिम प्रभागांच्या परिसरातच पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने बिल्डरांकडून अर्ज मागवले आहेत.

बिल्डरांनी रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची तयारी दर्शविल्यास त्यांना नियमानुसार त्याबदल्यात चटई क्षेत्र निर्देशांक दिला जाणार आहे. यामध्ये बिल्डरांचाही फायदा होणार आहे, शिवाय रहिवाशांचे परिसरातच पुनर्वसन होणार असल्याने नागरीकांना दिलासा मिळेल, असे पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्रकल्प बाधितांनी स्थलांतरास नकार दिल्यास त्यांना त्या बदल्यात आर्थिक नुकसान भरपाई दिली जाईल, असे धोरण पालिकेचे आहे.

या नुकसान भरपाईचा फॉर्म्युला वादात सापडला असून त्यात स्थानिक बाजार भावानुसार नुकसान भरपाई मिळणार नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका सभागृहात विरोध केला होता. दरम्यान, पालिकेने मुंबईतील प्रत्येक परिमंडळात प्रकल्पबाधितांसाठी दहा हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चांदिवली, दहिसरपाठोपाठ मुलुंड, भांडूप येथे खासगी जमिन मालकांकडून घरे बांधून घेतली जाणार आहेत.

या तीन रस्त्यांचे रुंदीकरण -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सी. डी रोडपासून टर्नर रोडपर्यंत : ४२ बांधकामे बाधित
पाली हिल रोड एस. व्ही. रोडपासून मेहबूब स्टुडिओपर्यंत : १३ बांधकामे बाधित
ऑफ पिटर डायस रोड : १६ बांधकामे बाधित

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages