पर्यटकांसाठी वांद्रे बँडस्टँड येथे ‘ट्री हाऊस’ उभारणारमुंबई - मुंबईसह विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वांद्रेतील बँडस्टँड येथे ‘ट्री हाऊस’ उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. राज्याचे पर्यटन, पर्यावरण व उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महापालिका व राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) यांच्या संयुक्तपणे हे ‘ट्री हाऊस’ उभारले जाणार आहे.

मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि पर्यटकाच्यादृष्टीने आकर्षक बनवण्यासाठी मुंबई महपालिकेतर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमात आता वांद्रे बँडस्टँड येथील पालिका उद्यानात ट्री हाऊस उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ५०० चौ.मी. जागेत येत्या सहा महिन्यांत आकर्षक आणि पर्यावरण पूरक असे ‘ट्री हाऊस’ उभे राहिल. संपूर्णपणे लाकडाचा वापर करून हे ट्री हाऊस उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी)एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या उपक्रमामुळे पर्यटनात व मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. येत्या स्थायी समितीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

कसे असणार ट्री हाऊस -
- हे ट्री हाऊस पूर्णपणे लाकडापासून तयार करण्यात येणार आहे. या ट्री हाऊसमध्ये जाण्यासाठी शिडीची व्यवस्था असेल. शिवाय दुसरया झाडावरूनही ट्री हाऊसमध्ये जाण्यासाठी व्यवस्था तसेच सुमारे ५०० चौरस मीटर जागेत हे ट्री हाऊस असेल.
- या ठिकाणी मुले, पर्यटक, मुंबईकरांना जाऊन निसर्गसौंदर्य न्याहाळता येईल. शिवाय फोटो-सेल्फी घेता येईल. या ठिकाणी जंगलात वास्तव्य केल्याचा अनुभव येणार आहे. सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
- मिठी नदीच्या सौंदर्यीकरणापासून आकर्षक फुटपाथ, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण असे अनेक उपक्रम आहेत.


Post a Comment

0 Comments