चेंबूरमध्ये दरड कोसळली, दोन जण गंभीर जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2022

चेंबूरमध्ये दरड कोसळली, दोन जण गंभीर जखमी


मुंबई - मुंबईत पाऊस सुरु झाला की पडझडीच्या घटना घडतात. यंदा पहिल्याच पावसात चेंबूर - वाशीनाका येथील भारतनगर परिसरातल्या डोंगर उतारावरील झोपड्यांवर दरड कोसळून दोनजण जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे घडली. जखमींवर शीव येथील लोकमान्य ठिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली. यापूर्वीही या परिसरात दरड कोसळून काहींचा जीव गेला होता.

चेंबूर- वाशीनाका येथील न्य़ू भारत नगर येथील काही झोपड्या डोंगर उतारावर वसल्या आहेत. दरवर्षी मुसळधार पावसांत येथील रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहतात. डोंगराच्या भयाखाली असलेल्या या झोपड्यांचा परिसर बीआरसीच्या हद्दीत येतो. पाऊस कोसळायला सुरुवात झाली की येथील डोंगरावरील मातीसह मोठे दगड झोपड्यांवर पडण्याचा धोका असतो. रविवारी पहाटे डोंगरावरील मोठा दगड उतारावर असलेल्या झोपडपट्ट्यांवर पडला. यात येथील रहिवासी अरविंद प्रजापती (२५) आणि आशिष प्रजापती (२०) हे दोघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही भाऊ आहेत. या जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. पहिल्या पावसांतच घडलेल्या या घटनेने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मागील वर्षीच्या जुलै महिन्यात याच परिसरात संरक्षण भिंतीचा भाग कोसळून तब्बल १८ जणांना जीव गमवावा लागला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील डोंगर उतारावरील झोपड्यांना पावसांत स्थलांतरीत होण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad