अन्न सुरक्षा निर्देशांकात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अन्न सुरक्षा निर्देशांकात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर

Share This


नवी दिल्ली, दि. 7 - अन्न सुरक्षा क्षेत्रात उत्तम कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने राज्यांच्या अन्न सुरक्षा निर्देशांकात ७० गुणांसह देशात तिसरे स्थान मिळविले आहे. या उपलब्धीसाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते आज राज्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच खाद्य व्यवस्था सुधारासाठी राज्यातील ११ शहरांनाही गौरविण्यात आले.

जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या औचित्याने आज केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने एफडीए भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध श्रेणींमध्ये पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंगल उपस्थित होते.

महाराष्ट्राची ७० गुणांसह उत्तम कामगिरी -
या कार्यक्रमात राज्यांचा ‘अन्न सुरक्षा निर्देशांक-२०२१-२२’ (चौथी आवृत्ती) जाहीर करण्यात आला. एकूण ५ मानकांच्या आधारे मोठी राज्ये, लहान राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांची अन्न सुरक्षा क्षेत्रातील प्रगती या निर्देशांकात मांडण्यात आली आहे. महाराष्ट्राने पाचही मानकांमध्ये उत्तम कामगिरी नोंदवत एकूण ७० गुणांसह देशातील एकूण २० मोठ्या राज्यांच्या गटात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वर्षीच्या १५व्या स्थानाहून महाराष्ट्राने थेट तिसऱ्या स्थानावर घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते राज्याचे अन्न व सुरक्षा आयुक्त परिमल सिंह यांनी या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला.

राज्याने मनुष्यबळ विकास व संस्थात्मक मानकात ११ गुण पटकाविले आहेत, अनुपालन मानकात २२ गुण, अन्न परिक्षण-पायाभूत सुविधा आणि निरीक्षण या मानकात १०.५, प्रशिक्षण व क्षमता बांधणी मानकात १० आणि ग्राहक सबलीकरण मानकात १६.५ असे एकूण पाच मानकात १०० पैकी ७० गुण मिळविले आहेत. ८२ गुणांसह तामीळनाडू प्रथम तर ७७.५ गुण मिळवून गुजरात दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत.

राज्यातील ११ शहरांची सरस कामगिरी -
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने वर्ष २०२१ -२२ साठी अन्न व्यवस्था सुधार कार्यक्रमांतर्गत देशातील जिल्हा व शहारांसाठी ‘इट राईट चॅलेंज’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ११ शहरांनी चमकदार कामगिरी करून पुरस्कार पटकाविला. आज या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला व पुरस्कारही वितरीत करण्यात आले. यात राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, वर्धा, औरंगाबाद, नाशिक आणि लातूर शहरांचा समोवश आहे. डॉ. मनसुख मांडविया याच्या हस्ते राज्याचे अन्न व सुरक्षा आयुक्त परिमल सिंह, सह आयुक्त डॉ. शशिकांत केंकरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील जिल्हा व शहारांनी परवाना नोंदणी वाढविण्यात, सर्वेक्षण नमुने नियोजनात, हाय रिक्स गटातील अन्न स्थापना तपासणीत आणि अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे आदि मानकांवर सरस कामगिरी केली आहे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages