सांताक्रुझ परिसरातील नागरिकांना पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल - आदित्य ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2022

सांताक्रुझ परिसरातील नागरिकांना पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल - आदित्य ठाकरे


मुंबई - जोरदार पावसाप्रसंगी पाणी साचण्यापासून मिलन सबवेला दिलासा देण्यासाठी साठवण जलाशयाचे काम अत्यंत वेगाने सुरु असून यंदा त्याचा तात्पुरता वापर सुरु करता येणार आहे. त्यामुळे सांताक्रुझ परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल. हिंदमाता व मिलन सबवे येथील साठवण जलाशय कामांच्या धर्तीवर मुंबईत आणखी इतर ठिकाणी देखील अशा उपाययोजना करण्यात येतील, असे उद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.

सांताक्रुझ येथील मिलन भुयारी मार्ग (सबवे) येथे जोरदार पावसाप्रसंगी साठणाऱया पाण्याचा निचरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्यामार्फत मिलन सबवे जवळच्या लायन्स क्लब मैदानात साठवण जलाशय बांधण्यात येत आहे. या जलाशयाच्या कामाच्या प्रगतीची राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (दिनांक १७ जून २०२२) दुपारी पाहणी केली, त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. या पाहणी प्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मेस्त्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी, हिंदमाता परिसराला पावसाळी पाण्यापासून दिलासा देण्यासाठी साठवण जलाशय सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद महाजन उद्यान येथे बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गांधी मार्केट येथे देखील याच स्वरुपाची उपाययोजना करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा उपसा करुन ते या जलाशयांमध्ये साठवले जाणार आहे. याच स्वरुपाची उपाययोजना मिलन सबवेतही केली जात आहे. त्यामुळे हिंदमाता, गांधी मार्केट आणि मिलन सबवे या तीनही परिसरांना जोरदार पावसाप्रसंगी साचणाऱया पाण्यापासून दिलासा मिळेल. एकूणच संपूर्ण मुंबईत पावसाळी पूरस्थितीपासून दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

मिलन सबवे येथील साठवण जलाशय हे सुमारे २ कोटी लीटर क्षमतेचे आहे. मिलन सबवे परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास त्याचा उपसा करुन या जलाशयात साठवले जाईल. त्यासाठी ३ हजार घन मीटर प्रतितास क्षमतेचे एकूण दोन उदंचन पंप कार्यान्वित केले जातील. म्हणजेच प्रतितास ६ हजार घन मीटर या क्षमतेने पाण्याचा उपसा होऊ शकेल. दिनांक ८ एप्रिल २०२२ पासून या साठवण जलाशयाचे काम सुरु करण्यात आले आहे. ७० मीटर x ५५ मीटर आकाराच्या या जलाशयाची खोली सुमारे १०.५ मीटर असेल. पैकी, ८ मीटर खोलीपर्यंत खोदकाम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सुमारे ७० टक्के खोदकाम पूर्ण झाले असून जुलै २०२२ अखेरीसपर्यंत या साठवण जलाशयाचा तात्पुरत्या स्वरुपात प्रत्यक्ष उपयोग सुरु करता येणार आहे. तर या साठवण जलाशयाचे छत (स्लॅब) व इतर अनुषंगिक कामे ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण होतील. मात्र, त्यापूर्वीच म्हणजे जुलै अखेरपासून या जलाशयाचा उपयोग करता येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad