मुंबई - मुख्याध्यापक हा शाळा आणि प्रशासन यांना जोडणारा दुवा असतो. ‘जसा मुख्याध्यापक, तशी शाळा’ हे वास्तव असते. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील मुख्याध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, शाळांचा मुख्याधिकारी म्हणूनच त्यांनी सर्वतोपरी भूमिका बजावावी, यासाठी नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, असे उद्गार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी काढले. महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी भिडे बोलत होत्या.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नेतृत्व कौशल्य कार्यशाळेचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने सहआयुक्त अजित कुंभार तर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्च्या वतीने संचालक डॉ. आर. श्रीनिवास अय्यंगार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये सर्वच घटकांमधील विद्यार्थी शिकतात. त्यातही बहुसंख्य विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. अशा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून महानगरपालिका वैविध्यपूर्ण उपक्रम राबवते. विद्यार्थ्यांचे वैविध्य, शिक्षण विभागातर्फे राबवले जाणारे उपक्रम, प्रशासकीय कामे अशा सर्व बाबी लक्षात घेतल्या तर मुख्याध्यापकांवर मोठी जबाबदारी येवून ठेपते. अशा स्थितीत त्यांना नेतृत्व कौशल्याचे धडे देणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांना नानाविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरेल. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या व्यक्तिगत विकासासाठी व एकूणच शाळांच्यादृष्टीने देखील ही कार्यशाळा व प्रशिक्षण एक अभिनव उपक्रम आहे, असे भिडे यांनी नमूद केले.
सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी देखील शिक्षण विभाग वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. त्याचाच एक भाग असलेले नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण हे प्रत्यक्ष कृतीवर आधारित असल्याने मुख्याध्यापकांनी त्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन कुंभार यांनी केले.
महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्रा. कविता लघाटे, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, पालिकेच्या शाळांचे सुमारे १२० मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment