बेस्टच्या कंत्राटी चालकांचे पुन्हा ‘काम बंद’ आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2022

बेस्टच्या कंत्राटी चालकांचे पुन्हा ‘काम बंद’ आंदोलन


मुंबई - बेस्टमधील कंत्राटी चालकांचे वेतन वेळेत मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा कामबंद आदोलन सुरु केले आहे. रविवारपासून खासगी कंत्राटदाराच्या बसगाड्यांच्या चालकांनी संप पुकारला आहे. हा संप दुस-या दिवशी सोमवारीही सुरु राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. रविवारी वडाळा आगारातून एम्.पी. ग्रूपच्या ४८ बसगाड्यांचे बसचालक कामावर न आल्याने या बसेस चालवण्यात आल्या नाहीत. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टच्या २९ बसगाड्या चालवल्या. तर सोमवारीही संप सुरु राहिल्याने वडाळा आगारातून एम्.पी. ग्रूपच्या ६३ बसगाड्या चालवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी २७ बसगाड्या चालवल्या. दरम्यान प्रश्न सुटेपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कंत्राटी चालकांनी घेतला आहे.
 
दोन - अडीच महिन्यांपूर्वी वेतन थकल्याने कामगारांनी बेमुदत कामबंद आदोलन केले होते. यावेळी कामगारांचे थकलेले वेतन व पुढील वेतन नियमित मिळेल तसेच इतर समस्याही सोडवल्या जातील असे आश्वासन दिले होते. मात्र या समस्या अजूनही कायम आहेत. कामगारांना वेळेत वेतन न मिळाल्याने कंत्राटी चालकांनी कामबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारपासून सुरु केलेले आंदोलन सोमवारीही सुरुच राहिल्याने बेस्टच्या अनेक मार्गावर त्याचा परिणाम झाला. या संपामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांचा धंदा मात्र तेजीत चालला.

समस्या सोडवण्याकडे दुर्लक्षच -
बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. बेस्ट उपक्रमाने नियुक्त केलेल्या सहा कंत्राटदारांनी भाडेतत्वारील बसगाड्या उपलब्ध केल्या असून, त्या विविध मार्गांवर चालवण्यात येत आहेत. भाडेतत्वावरील बसगाडीवर संबंधित कंपनीकडूनच कंत्राटी चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चालकांना वेळेवर वेतन मिळालेले नाही. तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कमही त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. वडाळा आगारात एम.पी. ग्रुपतर्फे भाडेतत्वावर बसचा पुरवठा करण्यात आला असून, या कंत्राटदाराने नियुक्त केलेले कंत्राटी चालक त्या चालवत आहेत.

संपामुळे बेस्टसेवेवर परिणाम -
रविवारपासून बेस्टच्य़ा कंत्राटी चालकांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने दिवसभरात ६३ कंत्राटी बसेस चालवण्यात आल्या नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने आपल्या २७ बस चालवून प्रवाशांना सेवा दिली. मात्र तेवढ्या पुरेसा नव्हत्या. त्यामुळे बेस्टने प्रवास करणा-या प्रवाशांचे हाल झाले. थकीत वेतन आणि भविष्य निर्वाहनिधीचा प्रश्न सुटल्याशिवाय़ आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कंत्राटी कामगारांनी घेतल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

बेस्टच्या ताफ्यातील बसेस -
बेस्टच्या मालकीच्या बसेस - १८५४
भाडेतत्वावरील बसेस - १७९३
एकूण बसेस - ३६२७

या मार्गावरील बससेवा बंद राहिल्या -
सोमवारच्या आंदोलनाने ६३ बस रस्त्यावर आल्या नाहीत. वडाळा रेल्वे स्थानक ते हिदुस्थान कंपनी, गांधीनगर, गोदरेज कॉलनी, कन्नमवार नगरसह अन्य काही मार्गांवर या सेवा चालल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. यापूर्वी, मे महिन्यात वडाळा आगारासह पाच आगारातील कंत्राटी चालकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते.

टॅक्सी चालकांचा धंदा तेजीत -
कंत्राटी बस चालकांनी कामबंद आंदोलन केल्याने महत्वाच्या मार्गावरील बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. बसेस नसल्याने रोज प्रवास करणा-या प्रवाशांना टॅक्सीचा आधार घ्यावा लागला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad