अमरमहल ते परळ भूमिगत जलबोगदा अवघ्या दहा महिन्यात पूर्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2022

अमरमहल ते परळ भूमिगत जलबोगदा अवघ्या दहा महिन्यात पूर्णमुंबई - परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी सुमारे ९.८ किलोमीटर लांब अंतराच्या भूमिगत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत अमरमहल ते वडाळा आणि वडाळा ते परळ अशा दोन टप्प्यात खनन करण्यात येत आहे. अमरमहाल ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे खनन काम अवघ्या १० महिन्यांत म्हणजे नियोजित कालावधीच्या ४ महिने आधीच पूर्ण झाले आहे. महापालिकेने कमी वेळात हे काम पूर्ण करून विक्रमी नोंद केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढणार आहे.

पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत अमरमहल ते वडाळा व पुढे वडाळा ते परळ हा एकूण ९.८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा बांधण्याचा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. जल बोगदा खनन करण्यासाठी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) देखील कार्यरत आहे. प्रकल्पातील दोन बोगद्यांपैकी पहिल्या टप्प्यातील हेडगेवार उद्यान (अमरमहाल) ते प्रतीक्षा नगर (वडाळा) दरम्यानच्या सुमारे ४.३ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खनन दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु करण्यात आले होते. सुमारे १४ महिने कालावधीत म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. अंदाजे सुमारे १४ महिने कालावधी असताना ४ महिने आधीच अवघ्या दहा महिन्याच्या कालावधीत कामाची विक्रमी नोंद केली आहे. हे खनन काम पूर्ण होवून टीबीएम मशीन बाहेर पडले आहे.

दरम्यान वडाळा ते परळ या दुस-य़ा टप्प्यातील भूमिगत जलबोगद्याचे खनन दीड महिन्यानंतर सुरु होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण करुन बाहेर पडलेले बोगदा खनन संयंत्र सुमारे ८ अंशात फिरवून दुस-या टप्प्यातील कामास सुरुवात केली जाणार आहे.

अमरमहाल ते परळ हा या प्रकल्पाचे आजपर्यंत ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. नियोजित वेळेत म्हणजेच एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होईल, असे पालिकेने म्हटले आहे. सदर जलबोगद्याद्वारे एफ/उत्तर, एफ/दक्षिण तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad