मुंबई - कोरोनामुळे मुंबईत थंडावलेली प्लास्टिक बंदी कारवाई १ जुलैपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र मागील चार महिन्यांत कारवाईचा वेग वाढलेला दिसत नाही. या कालावधीत आतापर्यंत फक्त २९०६ किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर २९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील १० ऑक्टोबरपर्यंत २५५१ किलो ग्रॅम प्लास्टिक जप्त व २४ लाख ७० हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला होता. म्हणजे २० दिवसांत अवघे ४०० किलो ग्रॅम प्लास्टिक जप्त व पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. दिवाळीत कारवाई सुरु ठेवली असतानाही वेग वाढलेला दिसत नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई धडाक्याने सुरु झाली होती. मात्र कोरोनाचे संकटामुळे दोन वर्ष प्लास्टिक कारवाई थांबली होती. गेल्या १ जुलैपासून ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र कारवाईचा वेग वाढलेला दिसत नाही. अजूनही फेरीवाले, बाजारात सर्रास प्लास्टिक पिशव्या वापरताना दिसत आहेत. अजून मोठी हॉटेल्स, मॉल आदी मोठ्या व्यवसाया ठिकाणी कारवाईची तीव्रता वाढलेली नसल्याने प्लास्टिक बंदी बाबत फारसा धाक राहिलेला नसल्याचे काही व्यवसायिकांकडून सांगण्यात आले. दिवाळीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करण्यात येत असल्याने पालिकेने दिवाळीतही प्लास्टिक कारवाई मोहिम सुरु ठेवली होती. मात्र २० दिवसांत फक्त ४०० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
आरोग्याला घातक आणि पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणार्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुराला याच पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणार्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला.
या प्लास्टिकवर बंदी -
- ५० मायक्रॉन प्लॅस्टिकपासून बनवल्या जाणार्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या); प्लॅस्टिकपासून बनवण्यात येणार्या व एकदाच वापरून टाकून दिल्या जाणार्या (डिस्पोजेबल) वस्तू उदा. ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे इत्यादी; हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्या प्लॅस्टिकच्या वस्तू, द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे कप/पाऊच, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक आणि प्लॅस्टिक वेष्टन यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment