मध्य रेल्वेवरील कर्नाक पूल इतिहास जमा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2022

मध्य रेल्वेवरील कर्नाक पूल इतिहास जमा



मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यानचा ब्रिटीश कालीन कर्नाकपुलाचे पाडकाम वेळेत पूर्ण करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत म्हणजे १७ तासानंतर सीएसएमटी वरून ३ वाजून ५० मिनीटांनी मध्य रेल्वेवर पहिली लोकल ठाण्याच्या दिशेने रवाना झाली. तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल लोकल सायंकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी पहिली लोकल सुरु झाली. निर्धारित वेळेत लोकल सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. दरम्यान ब्रीटिशकालीन कर्नाक पूल आता इतिहास जमा झाला आहे.

सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यानच्या १५४ वर्षे जुन्या धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचे तोडकाम शनिवारी, १९ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून सुरु करण्यात आले. यासाठी शनिवारी रात्री पासून २७ तासांचा ब्लॉक घेऊन पाडकाम सुरु करण्यात आले. या कालावधीत १ हजारहून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सीएसएमटी-भायखळा लोकल वाहतूक १७ तासांनी तर सीएसएमटी-वडाळा लोकल २१ तासांनी पूर्ववत करण्याची वेळ रेल्वे प्रशासनाने जाहिर केली होती. ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते भायखळा व हार्बर मार्गावर वडाळा ते सीएसएमटी दरम्यान एकही लोकल धावली नाही. या ब्लॉकमुळे अनेक प्रवाशांनीही आपल्या प्रवासाचे नियोजन करून लोकल प्रवास शक्यतो टाळला. महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांनी बेस्ट बस व खासगी वाहनांचा आधार घेतला. दादर, कुर्ला वगळता ब-यापैकी गर्दी होती. त्यात मध्य पुलाचे पाडकाम वेळेआधी पूर्ण करून रेल्वेसेवा पूर्ववत केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

सीएसएमटी ते भायखळा, वडाळा आणि मेल-एक्सप्रेस कोचिंग यार्डवर तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. पुलाचे पाडकाम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी रेल्वेने आपली यंत्रणा कामाला लावली. एकूण ४०० मनुष्यबळ तसेच ३०-३५ अधिकारी, १०० पर्यवेक्षक, प्रति शिफ्ट मदतनीसांसह ५० गॅस कटर. एकूण सुमारे ३०० गॅस सिलिंडर वापरण्यात आले. तसेच एकूण ४ क्रेन तैनात करून ३५० टनाच्या ३ क्रेन आणि ५०० टन क्षमतेची १ क्रेन. रिलीझ मटेरियलच्या स्थलांतरासाठी ४ हायड्रा क्रेन उपलब्ध होत्या. साईट मेगा फोनसह पुरेसा आरपीएफ कर्मचारी तैनात होते. वैद्यकीय पथकासह २ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ६ टॉवर वॅगन वायर डिस्कनेक्ट व पुन्हा जोडण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पूलाचे पाडकामाचे व पुलाचा सांगाडा हटवण्याचे काम यशस्वीपणे वेळेआधी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे तब्बल १७ तासानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पहिली धीमी लोकल रवाना झाली. दादर ते भायखळा दरम्यान सर्व स्थानकांवर उद्घोषणा करण्यात आल्याने सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. ब्लॉक कालावधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ठाणे लोकल दुपारी ३.५० मिनिटांनी सोडण्यात आली आहे. ही लोकल कर्नाक पूलाजवळ ४ वाजता पोहोचली.

असा होता ब्लॉक -
- सीएसएमटी -भायखळा १७ तासांचा ब्लॉक - शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी ४ वाजेपर्यत
- सीएसएमटी- वडाळा २१ तासांचा ब्लॉक - शनिवारी रात्री ११ ते रविवारी रात्री ८ वाजेपर्यत
- कोचिंग यार्ड २७ तासांचा ब्लॉक - शनिवारी रात्री ११ ते सोमवारी पहाटे २ वाजेपर्यत

असे झाले पुलाचे पाडकाम -
- कर्नाक पुलाच्या स्टीलच्या सांगाड्याची लांबी - ५० मीटर आणि रुंदी -१८.८ मीटर होती. सांगाड्यात एकूण ७ स्पॅन होते. या स्पॅनचे ४४ तुकडे करण्यात आले. एकावेळी एकच तुकडा उचलण्यात आला . १८ तुकड्यांचे प्रत्येकी वजन १६ टन होते. १४ तुकड्यांचे प्रत्येकी वजन ३ टन होते. १२ तुकड्यांचे प्रत्येकी वजन १० टन तर ३५० टन वजनी क्षमतेच्या ३ क्रेन तर ५०० टन वजनी क्षमतेची एक क्रेन होती. ब्लॉकच्या पहिल्या आठ तासानंतर पुलाच्या सांगाड्याचा मधला भाग पूर्णपणे हटवण्यात आला होता.

अतिरिक्त बेस्ट बसची सेवा -
लोकल ट्रेनच्या मेगाब्लॉक दरम्यान बेस्टने शनिवार रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६.३० वाजेपर्यत सीएसएमटी - वडाळा, सीएसएमटी - दादर आणि भायखळा (प) - कुलाबा (प्रत्येक मार्गावर चार अतिरिक्त बस) यासह तीन मार्गांवर १२ जादा बस चालविल्या. सात प्रमुख मार्गांवर रविवारी आणखी ३५ बस सोडण्यात आल्या. रविवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत इलेक्ट्रिक हाऊस- वडाळा (प), सीएसएमटी- धारावी डेपो, मुखर्जी चौक- प्रतीक्षा नगर, मंत्रालय- माहुल, इलेक्ट्रिक हाउस- के सर्कल आणि अँटॉप हिल- कोतवाल उद्यान या मार्गावर ३५ जादा बस सोडण्यात आल्या. यामुळे रेल्वे सेवा बंद असली तरी बस सुरु असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.

मुंबई महापालिका उभारणार नवा पूल -
१५४ वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल अखेर तोडण्यात आला आहे. हा उड्डाणपूल पाडल्यानंतर कर्नाक पुलाच्या जागी नवा पूल मुंबई महापालिकेकडून उभारण्यात येणार आहे.

कर्नाक पूल इतिहास जमा -
ब्रिटिशांनी सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान कर्नाक उड्डाण पुलाची निर्मिती १८६८ साली करण्यात आली होती. मध्य रेल्वेवरील सर्वात जुना आणि उंचीने लहान उड्डाण पुल म्हणून कर्नाक पूल ओळखला जातोय. हा उड्डाण पूल सर्वच १५४ वर्ष जुना असून सुरक्षा ऑडिटमध्ये धोकादायक ठरवला आहे.

कर्नाक पूल नाव कशावरून पडले-
तत्कालीन बॉम्बेचे गव्हर्नर जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्या नावावरून या पुलाला कर्नाक पूल असे नाव देण्यात आले. इंग्रजी, मराठी व गुजराती या तिन्ही भाषेत पुलाचे हे नाव तीन कोपऱ्यांत कोरलेले आहे. चौथ्या बाजूला या पुलाचे जहाजाचा नांगर (अँकर) हे बोधचिन्ह आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad