राज्यात २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत समता पर्वचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2022

राज्यात २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत समता पर्वचे आयोजन


मुंबई - राज्यात २६ नोव्हेंबर संविधान दिनापासून ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनापर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत  'समता पर्व' चे आयोजन केले जाणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासंदर्भात अभिवादनात्मक कार्यक्रमाचे आयोजन व समतापर्वाचा समारोप करण्यात येणार आहे. या कालावधीत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

दि. २५ नोव्हेंबर रोजी समता पर्वाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन, दि.२६ नोव्हेंबर रोजी प्रभात फेरी, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन, जिल्हास्तरावर पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन, दि. २७ नोव्हेंबर रोजी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रमाचे आयोजन, २८ नोव्हेंबर संविधान विषयक व्याख्याने, २९ नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवनात विभागाची ‘नवी दिशा’ या विषयावर पत्रकारांची कार्यशाळा, ३० नोव्हेंबर रोजी संविधान या विषयावर पत्रक, पोस्टर्स, बॅनर इत्यादीबाबत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन, अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांची 'अनुसूचित जाती उत्थान: दशा आणि दिशा' या विषयावर कार्यशाळा आयोजित करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहे.

दि. १ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा, दि. २ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यात  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींना भेटी, ३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी व वृद्ध यांच्यासाठी माहितीची कार्यशाळा, सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थींना  विविध लाभांचे वाटप व बक्षीस वितरण, ४ डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिराचे आयोजन, राज्यातील सर्व तालुकास्तरावर योजनांच्या माहितीची कार्यशाळा, ५ डिसेंबर रोजी संविधान जागर व ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासंदर्भात अभिवादनात्मक कार्यक्रमाचे आयोजन व समतापर्वाचा समारोप करण्यात येणार आहे.

अभिवादन रॅली व इतर राज्यस्तरीय कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व प्रादेशिक उपायुक्त, सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, राज्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांना समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समता पर्व आयोजित करताना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, त्या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचे पालन करून कार्यक्रम करावा, अशा सूचना शासनाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad