राज्यपालांनी चप्पल घालून केले शहिदांना अभिवादन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2022

राज्यपालांनी चप्पल घालून केले शहिदांना अभिवादन


मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरण काही केल्या सुटत नाही. कोश्यारी यांनी सात दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण प्रचंड तापले आहे. त्यातच आज त्यांनी चक्क मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केले. यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल वादात सापडले आहेत. दरम्यान राज्यपालांनी पोलीस हुतात्म्यांचा अपमान केला म्हणणे द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले आहे. 

मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याची जखम अजूनही भळभळतेय. या हल्ल्यात अनेक पोलिसांनी जिवाची बाजी लावून मुंबईकरांचे प्राण वाचवले. करकरे, कामटे, साळस्कर हे पोलिस अधिकारी लढता-लढता शहीद झाले. त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्या काळ्याकुट्ट दिवसाची आठवणही काढली तरी ऊर भरून येतो. या शहिदांना अभिवादन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शहिदांच्या अभिवादन कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी पादत्राणे काढून हुतात्मा स्मारकात शहिदांना अभिवादन केले. पुष्पचक्र अर्पण केले. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी अभिवादनावेळी चप्पल काढली नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे -
आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारक येथे २६ नोव्हेंबर हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या ठिकाणी चप्पल, जोडे काढणे आवश्यक नाही असे सांगितले. 

अलीकडेच राज्यपालांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी भेट दिली होती. त्याठिकाणी देखील हीच पद्धत पाळली जाते. त्यामुळे चप्पल पायात असताना हुतात्म्यांना अभिवादन केल्यामुळे राज्यपालांनी हुतात्म्यांचा अपमान केला असे म्हणणे अतिशय द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे आहे. आजच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव व इतर अधिकाऱ्यांनी देखील पादत्राणे घालून अभिवादन केले, असे राजभवनातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad