अनुसूचित जाती, नवबौद्ध मुला-मुलींसाठी चेंबूर येथे आयटीआय नूतन इमारत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2022

अनुसूचित जाती, नवबौद्ध मुला-मुलींसाठी चेंबूर येथे आयटीआय नूतन इमारतमुंबई - अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील मुला-मुलींसाठी मुंबई येथे विभागस्तरीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू होत असून यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर येथे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2022 रोजी या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

या आयटीआयमध्ये विजतंत्री, तारतंत्री, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इंटेरिअर डिझाईन अॅण्ड डेकोरेशन, प्रशितन व वातानुकूलीत टेक्नीशियन, ड्रॉप्समन ऑर्क्टीचर, लेदर गुड्स मेकर, फुटवेअर मेकर, आयओटी टेक्निशियन अशा 10 व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी 2 तुकड्या 440 प्रशिक्षणार्थीकरीता सुरु करण्यात येणार आहेत. या व्यवसायातील प्रवेश शैक्षणिक वर्ष 2023- 24 पासून डी. जी. नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त करून सुरु करण्यात येणार आहेत, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

मंत्री लोढा म्हणाले की, मुंबई व मुंबई लगतच्या परिसरात आगामी काळात उभारले जाणारे प्रकल्प व विद्यमान प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात आयटी, बी.पी.ओ. के.पी. ओ. मीडिया, एंटरटेन्मेन्ट, अॅनिमेशन, सेवा उद्योग, लघु व अवजड वाहन उद्योग, अलाइट इंजिनिअरिंग व त्यानुषंगाने मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्रात वाढ होत आहे. मुंबई येथे ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी विविध क्षेत्रातील उद्योग कार्यरत आहेत. या सर्व उद्योगांना अधिक शाश्वत कुशल मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण होत आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण पाहता कुशल रोजगार निर्माण करणाऱ्या संस्थांची संख्या कमी आहे. त्यामुळे अशा संस्था वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणानुसार प्रवेशप्रक्रीया राबविण्यात येते. सर्वसाधारण आयटीआयमध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील विद्यार्थ्यांकरिता प्रवेशासाठी प्रत्येक संस्थेत 13 टक्के जागा राखीव आहेत. तथापि, प्रवेशासाठी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त होतात. त्यामुळे या प्रवर्गातील असंख्य उमेदवारांना प्रवेश मिळत नाही व प्रवेशोच्छूक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. ही बाब विचारात घेऊन अनुसूचित जातीच्या युवकांना निरनिराळ्या अभ्यासक्रमामध्ये तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित करण्यासाठी विशेष घटक योजनेंतर्गत प्रत्येक विभागीय स्तरावर नाशिक, नागपूर, अमरावती व औरंगाबाद या 4 औद्योगिक प्रशिक्षण संस्था 2006 पासून असून यापैकी मुंबई विभागीय आयटीआयचा शुभारंभ होत आहे. या आयटीआयमध्ये नवीन उद्योगांच्या मागणीनुसार प्रशिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होईल, असे लोढा म्हणाले.

कौशल्य विकास केंद्राचाही होणार प्रारंभ -
या आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्रही सुरु करण्यात येत असून याचे उद्घाटन शनिवारी करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये कॉम्पुटर ऑपरेटर व इलेक्ट्रीकल वायरमन या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. साधारण 3 ते 6 महिन्यांचे अल्पमुदतीचे विविध अभ्यासक्रम या केंद्रावर विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत. हा कार्यक्रम दी फाइन आर्ट्स सोसायटी, आरसी मार्ग, मोनोरेल स्टेशन, चेंबूर येथे उद्या शनिवारी सायंकाळी 4 वाजता होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad