शाळांमध्ये 10 सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शाळांमध्ये 10 सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा होणार

Share This

मुंबई - भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी - आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी- आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. (Grandparents Day will be celebrated on September 10)

शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी मंत्री केसरकर यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला.

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या निर्णयाची माहिती देताना केसरकर म्हणाले, 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 16 हजार रूपये, माध्यमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 18 हजार रूपये तर उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना 20 हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येईल. हे मानधन 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येत आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये देखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना 14 हजार रूपये, पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार रूपये, कनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती यांना आठ हजार रूपये मानधन मिळेल.

मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा भवन उभारले जाणार असून मराठी भाषेशी संबंधित सर्व कार्यालये या इमारतीत एकत्र असणार आहेत. त्याचप्रमाणे छोटी संमेलने आयोजित करता येतील असे सभागृह, सुसज्ज ग्रंथालय, मुंबई बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांसाठी राहण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगून इतर भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दहावी इयत्तेत अडचण निर्माण होऊ नये यासाठी पर्यावरण विषयाप्रमाणे मराठी भाषेसाठी श्रेणी देता येईल का याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे मंत्री केसरकर यावेळी म्हणाले.

माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुंबईत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या त्यांच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त चेंबूर येथील 250 विद्यार्थीनी क्षमतेच्या वसतिगृहास माता रमाईंचे नाव देण्यात येणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची तसेच शाळांमधून वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages