मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना राहण्याच्या व्यवस्थेकरिता १४ हजार रुपये इतका विस्थापन भत्ता अधिक सहा ते सात हजार इतका घरभाडे भत्ता अशी एकूण २० हजार रुपये प्रत्येक महिन्याला सध्या अतिरिक्त रक्कम देण्यात येत आहे. या रकमेत वाढ करून २५ हजार रुपये करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री सामंत म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुमारे २७,९०० सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे ५५९२ सफाई कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहेत. सदर सेवानिवासस्थाने बरीच जुनी असल्यामुळे तसेच इतर सफाई कामगारांना देखील सेवानिवास्थाने प्राप्त होण्याकरिता, सद्य:स्थितीत सेवानिवासस्थाने असलेल्या वसाहतींचा महानगरपालिकेच्या निधीतून "आश्रय" योजनेंतर्गत पुनर्विकास करुन सफाई कामगारांसाठी सेवासदनिका बांधण्याचे महानगरपालिकेचे धोरण आहे. सद्य:स्थितीत सफाई कामगारांची सेवानिवासस्थाने असलेल्या ३० वसाहतींचा ४.०० चटई क्षेत्र निर्देशांक वापरून आश्रय योजनेंतर्गत पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. याअंतर्गत अंदाजे १२ हजार सेवा सदनिका उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू असल्यामुळे एखादा कर्मचारी सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त मृत सेवेसाठी असमर्थ ठरल्यास त्यांच्या पात्र वारसाला बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी दिली जाते. तसेच माजी कर्मचाऱ्याच्या नावावर असणारे सेवा निवासस्थान हस्तांतरीत करण्यात येते. अशा रितीने सफाई कामगारांचे सेवा निवासस्थान साखळी पध्दतीने पिढी दरपिढी हस्तांतरीत केले जात असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
या चर्चेत विधानसभा सदस्य संजय केळकर,अमित साटम, कालीदास कोळंबकर, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, सदा सरवणकर आणि तमिल सेल्वन यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment