मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला जोडणारा दुर्घटनाग्रस्त हिमालय पूल अखेर चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत आला आहे. सकाळी ८ वाजता हा पूल खुला करण्यात आला. या पुलामुळे सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्गात होणारी गर्दी कमी होईल आणि रस्ता ओलांडण्याचा त्रासही दूर होणार आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हिमालय पूल १४ मार्च २०१९ मध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर हा पूल पाडून नवीन बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मागील दीड वर्षापासून या पुलाचे काम सुरु होते. पूल बांधण्याबाबत पूल विभागाकडून आराखडा तयार करण्यात आला होता. नवीन आराखड्यानुसार हिमालय पूल टीकाऊ स्टेनलेस स्टीलचा बांधण्यात आला असून पुलाचे काम पूर्ण झाल्याने हा पूल गुरुवारपासून खुला करण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकाला व टाइम्स ऑफ इंडियाला जोडणारा हा पूल सतत रहदारीचा आहे. चार वर्षापूर्वी संध्याकाळी ७.२५ वाजता हा पूल पडून मोठी दुर्घटना घडली होती. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. तर २३ जण जखमी झाले होते. याप्रकरणी तत्कालिन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून पुलाचे ऑडिट करणाऱ्या डी. डी. देसाई असोसिएटेड इंजिनीअरिंग कन्सल्टन्ट आणि अँनालिस्ट प्रायव्हेट लिमिटेड व या पुलाची दुरुस्ती करणाऱ्या आर. पी. एस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणी काही पालिका अधिका-यांना अटकही करण्यात आली. अपघात झाला त्यावेळी दररोज ये-जा करणारे प्रवाशी पाच - दहा मिनिटे उशीर झाला म्हणून वाचले होते. चार वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हा पूल खुला करण्य़ात आला आहे. हिमालय पूल कोसळल्यानंतर हा पूल नव्याने बांधण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येत गेले. त्यात कोरोना प्रादूर्भावाची भर पडल्याने त्यास आणखी विलंब झाला.
मुंबईत पोलादापासून तयार करण्यात येणारा हा पहिलाच पूल ठरणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर त्याचा दैनंदिन स्तरावर सुमारे ५० हजार पादचाऱ्यांना फायदा होणार आहे. मुंबईतील जुने पूल लोखंडापासून तयार करण्यात आले आहेत. मुंबईतील खाऱ्या हवेचा लोखंडावर परिणाम होत असल्याने ते गंजत जातात. त्यासाठी पुलांची वारंवार देखभाल, दुरुस्ती करावी लागते. त्यासाठीच पालिकेने पोलादाचा पर्याय निवडला असून ते लवकर खराब होणार नाहीत, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पुलाकडे सरकता जिनाही बसविला जाणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, दिव्यांगांना पुलापर्यंत जाणे सुलभ होईल. हिमालय पुलाच्या बांधकामासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च झाले आहेत. या पुलाची लांबी ३३ मीटर आणि रुंदी ४.४ मीटर आहे.
अडथळे पार करीत पुलाचे काम पूर्ण -
हिमालय पुलाकडील पादचाऱ्यांची येजा, वाहनांची वर्दळ पाहता प्रत्यक्ष बांधकामासाठी कमी अवधी मिळाला. या पुलाच्या निविदा प्रक्रियेसह आरेखनात बदलाने आणखी कालावधी वाढला. रात्रीच्या सुमारास सलग कामासाठी दोन तासांचा अवधी मिळत असल्याने एकूण वेळापत्रकावर परिणामही झाला. या सर्व आव्हानांवर मात करत अखेर पुलाचे काम होऊन प्रवाशांच्या सेवेत आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गंज न पकडणारे स्टेनलेस स्टील!
लोखंडी पुलाला पावसाळ्यात गंज पकडतो. त्यामुळे मुंबईत नव्याने बांधण्यात येणारे पूल स्टेनलेस स्टीलचे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हिमालय पूल हा स्टेनलेस स्टीलचा बांधण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात गंज पकडण्याचा धोका नसेल आणि ५० वर्षे टिकेल. एका गर्डरची लांबी ३५.२११ मीटर इतकी आहे.
हजारो प्रवाशांना दिलासा -
काळबादेवी, क्राफर्ड मार्केट, जीटी रुग्णालय, कामा रुग्णालय, महापालिका मुख्यालय, टाइम्स इंडिया आदी ठिकाणी या पुलांवरून जाणे सोपे होते. या ठिकाणी जाण्यासाठी वळसा घेऊन अत्यंत वर्दळीतून रस्ता पार करावा लागत होता. आता पूल खुला झाल्याने या ठिकाणी रोज - ये- जा करणा-य़ा हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment