मुंबई - ʻकरुन होलिकेला नमन केले व्यसनांच्या राक्षसाचे दहनʼ व्यसनांची होळी या कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ, समाज कल्याण सामाजिक न्याय विभागाने केले होते. सीएसएमटी जवळच्या कॅपिटल सिनेमागृहाजवळ झालेल्या या अनोखा उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
होळी सणाचे औचित्य साधून ʻकरुन होलिकेला नमन केले व्यसनांच्या राक्षसाचे दहनʼ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती या उपक्रमातून करण्यात आली. दारु, गुटखा, सिगारेट, अमली पदार्थ, गांजा, अफू, गर्द, ड्रग्ज, चरस यांची वेष्टणे, आवरणे या व्यसनांचा आठ फुटी भव्य राक्षसाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. व्यसनमुक्तीसाठी उचलेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे समाज कल्याण विभाग, मुंबई शहर सहाय्यक आयुक्त, प्रसाद खैरनार यांनी यावेळी म्हटले.
कार्यक्रमाची सुरुवात T टोबँको, D ड्रग्ज या व्यसनमुक्तीवरील धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. शाहीर नंदू बनसोडे यांनी गीते, भारुड सादर केली. ठुमकेदार भारुडाने उपस्थित जनसमुदायांत व्यसनमुक्तीवर प्रबोधन करण्यात आले. व्यसनामुळे होणारे परिणाम याचे चित्रण यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातुन सादर करण्यात आले. व्यसनांचे दुष्परिणाम दर्शविणारी पोस्टर्स प्रदर्शनाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. व्यसनांचा आयुष्यावर किती घातक परिणाम होतो याची माहिती या जनजागृतीपर उपक्रमातून नागरिकांना देण्यात आली. वाचा विचार करा आणि निर्व्यसनी महाराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पात सहभागी व्हा या पत्रकांचे वाटपही यावेळी आयोजकांकडून करण्यात आले. स्वतः व इतरांना निर्व्यसनी करण्यासाठी नशाबंदी मंडळात सहभागी होण्याचे आवाहन करून उपस्थित जनसमुदायाला निर्व्यसनी राहण्याचा संकल्प नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी मार्गदर्शन करताना दिला.
व्यसनांच्या राक्षसाचे प्रतिकात्मक दहन मंडळाच्या सरचिटणीस, चिटणीस, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई ११ चे उपसंचालक राजन संखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सुनिल दहिवलकर, विद्यार्थी, कार्यकर्ते उपस्थित जनता यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती वर्षा विद्या विलास यांनी दिली.
No comments:
Post a Comment