मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा गुरुवारी (दिनांक १५ जून २०२३) सुरू होणार आहेत. पहिली ते दहावीच्या या शाळांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मुलांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्याच दिवसापासून विविध उपक्रम रावबिण्याचे ठरविले आहे. (Entrance Festival in Mumbai Municipal Schools)
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात गुरुवार, १५ जूनपासून होत आहे. सर्व शाळांमधील शिक्षक आणि इतर कर्मचारी १२ जूनपासून हजर झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मुलांच्या प्रवेशाची तयारी केली आहे. यामुध्ये वर्गखोल्या, पाण्याची टाकी, शाळेचे आवार आदींची स्वच्छता करण्यात आली. या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी २७ शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये वहया पुस्तके, गणवेश, दफतर, पाण्याची बाटली, बुट-मोजे आदींचा समावेश आहे.
बुधवारी, १३ जून रोजी ऑनलाईन वेबिनारद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. तसेच शाळा प्रवेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या वेबिनारमध्ये एक हजार मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्येक शाळेच्या स्मार्ट वर्गखोल्यामध्ये बसून मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.
गुरुवारी, १५ जून रोजी सकाळ सञाच्या शाळांमध्ये सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आणि दुपारच्या सञाच्या शाळांमध्ये दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा प्रवेश सोहळा होणार आहे. शाळांच्या प्रवेशाद्वारांवर फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तसेच वर्गखोल्यांमध्येही फुले आणि रंगीत फुग्यांची सजावट करण्यात आली आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२-२३ मध्ये मिशन ॲडमिशन अंतर्गत एक लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यात आला होता. यंदाही मिशन मिरिट हाती घेण्यात आले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment