मुंबईकरांनो, पावसात झाडांखाली थांबू नका ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2023

मुंबईकरांनो, पावसात झाडांखाली थांबू नका !


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळा पूर्व तयारीच्या कामांमध्ये महानगरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून छाटणी जवळपास पूर्ण केली आहे. तसेच जी झाडे कमी धोकादायक आहेत, अशा उर्वरित झाडांचीही शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने झाडांच्या छाटणीबाबत पूर्ण खबरदारी घेतली आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्यान विभागाकडून योग्य ती खबरदारी घेवून कार्यवाही केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे मुंबई महानगरातील प्रामुख्याने धोकादायक झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. वेगाने वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ते मनुष्यबळ साधनसामुग्रीसह व वाहनांसह उपलब्ध करुन घेण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी पावसात झाडांखाली थांबणे टाळावे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना झाड अथवा फांद्या तुटण्याची दाट शक्यता असते. याशिवाय वीज कोसळण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसापासून बचाव करताना मुंबईकरांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे. 

तात्काळ संपर्क करा - 
सोसायटीच्या आवारातील, परिसरातील, रस्त्यांभोवती अतिधोकादायक असलेल्या झाडांबाबत मुंबईकरांनी विभाग कार्यालयात तात्काळ कळवावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून करण्यात येत आहे. दिनांक १ ते १९ जून २०२३ दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात १४७ झाडे आणि २५३ फांद्या तुटल्या आहेत. यात महानगरपालिकेच्या हद्दीतील ३९ तर खासगी मालमत्तेतील १०८ झाडांचा समावेश आहे. भविष्यात दुर्घटना घडू नये म्हणून उद्यान विभागाने महानगरात अतिधोकादायक झाडे आणि फांद्यांचे सर्वेक्षण केले असून, त्यानुसार खबरदारी घेत झाडांची छाटणी करण्यात आली आहे. 

वृक्ष छाटणीसाठी बजावल्या नोटिसा - 
उद्यान विभागाने शासकीय आणि खासगी मालमत्तेच्या ठिकाणी असलेल्या साडे चार हजार झाडांच्या छाटणीबाबत संबंधित विभागांना आणि मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. या झाडांची देखील लवकरात लवकर छाटणी करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. तसेच मुंबईकरांनी आपल्या आवारातील धोकादायक झाडांची रितसर परवानगी घेऊन छाटणी करून घ्यावी आणि भविष्यातील धोका टाळावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad