मुंबई - मुंबईतील श्री गणेशोत्सवात यंदा दहा दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण २ लाख ५ हजार ७२२ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. पैकी, ७६ हजार ७०९ मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्यात. यामध्ये घरगुती ७२ हजार २४० गणेशमूर्ती समाविष्ट आहेत. कृत्रिम विसर्जन स्थळावर मूर्ती विसर्जित करण्याचा ओघ यंदा वाढला आहे. एवढेच नव्हे तर, नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळ मिळून एकूण ५०० मेट्रिक टन निर्माल्य संकलन देखील करण्यात आले आहे.
मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दहा दिवसांच्या कालावधीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे सुमारे १० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह उत्तम सेवा मुंबईतील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला चालना देण्याच्या दृष्टीने यंदा मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०० कृत्रिम विसर्जनस्थळांवर देखील मूर्ती विसर्जन व्यवस्था केलेली होती.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसात सार्वजनिक, घरगुती, हरतालिका आणि गौरी या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांच्या ठिकाणी करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा कृत्रिम तलावांना पसंती दिली. एकूण १ हजार ९०४ गणेशोत्सव मंडळांनी कृत्रिम तलावांत मूर्तीचे विसर्जन केले. घरगुती मूर्तींमध्ये यंदा सर्वाधिक अशा ७२ हजार २४० मूर्तींचे विसर्जन झाले. तर २ हजार ५६५ हरतालिका आणि गौरींचे विसर्जन कृत्रिम तलावांच्या ठिकाणी करण्यात आले, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
दहा दिवसांच्या घरगुती गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन -
दीड दिवस- २७ हजार ५६४
पाच दिवस- २९ हजार ७९२
सात दिवस- ४ हजार ६७७
दहा दिवस- १० हजार २०७
एकूण– ७६ हजार ७०९
दहाव्या दिवशी विसर्जन झालेल्या एकूण मूर्ती -
सार्वजनिक- ६ हजार ९५१
घरगुती- ३२ हजार ३४५
गौरी- ४६१
एकूण- ३९ हजार ७५८
दहाव्या दिवशी कृत्रिम तलावांत विसर्जन झालेल्या मूर्ती -
सार्वजनिक- ७४०
घरगुती- १० हजार २०७
गौरी- १६०
एकूण- ११ हजार १०७
जुहू समुद्र किनारी स्वच्छता मोहीम -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जुहू समुद्र किनारी आज (दिनांक २९ सप्टेंबर २०२३) 'क्लिनथॉन 2.0' ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गणेश मूर्ती विसर्जन सोहळा संपन्न झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका के पश्चिम विभागाच्या वतीने आणि 'दिव्याज्' व 'भामला फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली. याठिकाणी ४६० मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला आणि १ हजार ३५० किलो निर्माल्य संकलन करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमीत साटम, अमृता देवेंद्र फडणवीस, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानगरपालिका कर्मचारी, कामगारांसह राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आदींचे दोन हजार स्वयंसेवक या मोहीमेत सहभागी झाले.
यंदा विसर्जनस्थळांवर ५०० मेट्रिक टन निर्माल्य -
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार यंदा गणेशोत्सवात संकलित निर्माल्यापासून सेंद्रीय खत करण्याची कार्यवाही घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येतआहे, अशी माहिती देत उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव या म्हणाल्या की, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सुमारे ५०० मेट्रिक टन निर्माल्य संकलन केले आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये असणा-या सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हे निर्माल्य हलविण्यात आले आहे. मुंबईतील २४७ नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मिळून ३७१ निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. तसेच ९८ वाहनांचा वापर करून हे निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठवण्यात आले. निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरूवातही झाली आहे. पुढील साधारपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. तयार होणारे हे सेंद्रीय खत महानगरपालिका उद्यानांमध्ये खत म्हणून वापरण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त जाधव यांनी दिली.
No comments:
Post a Comment