मुंबई - महापालिकेच्या आणिकगाव मनपा हिंदी शाळेतील विद्यार्थ्यांना शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत मध्यान्ह भोजन देण्यात आले. त्यामधून १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांना मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याप्रकरणाची महापालिका आयुक्तांनी दखल घेऊन जबाबदार संस्था व संबधित अधिका-यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. २४ तासांच्या आत अहवाल सादर करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील चेंबुर परिसरातील आणिकगाव मनपा हिंदी शाळेमध्ये आज (१३ ऑक्टोबर) रोजी सकाळ सत्रात शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाच्या सेवनानंतर ३ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या व इतर १३ विद्यार्थ्यांना मळमळ सुरु झाल्यामुळे सर्व १६ विद्यार्थ्याना सदर परिसरातील पं. मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महानगरपालिकेचे डी. गंगाथरण सह आयुक्त (शिक्षण), राजेश कंकाळ - शिक्षणाधिकारी (प्राथमिक). संबंधित उपशिक्षणाधिकारी व इतर अधिकारी यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी केली. तसेच घटनास्थळी जाऊन तपासणी केली. सदर शाळेमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या आहाराचा नमूना महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत जी / उत्तर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेला असून विश्लेषणाचा अहवाल लवकरच प्राप्त होईल.
शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेकडून महानगरपालिकेच्या २४ शाळांमधील अंदाजे ६७९७ विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करण्यात येतो. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळ सत्रातील सर्व शाळांमध्ये आहार पाठविण्यात आलेला होता. आणिकगांव मनपा शालेय इमारतीमधील हिंदी माध्यमातील १८९ विद्यार्थ्यांना व मराठी माध्यमाच्या ५१ विद्यार्थ्यांना आहाराचा पुरवठा करण्यात आला होता. शाळेतील उपस्थितीत शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरवातीला ३ मुलांना उलट्या सुरु झाल्या व त्यानंतर १३ मुला-मुलींना मळमळ व उलट्या सुरु झाल्या. त्यामुळे सर्व १६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. शांताई महिला संस्थेमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या आहारामुळे सदर विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली असल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे सदर संस्थेच्या स्वयंपाकगृहामध्ये डी. गंगाथरण - सह आयुक्त (शिक्षण), राजेश कंकाळ - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व वाणी - उपशिक्षणाधिकारी यांनी संयुक्त पाहणी करुन स्वयंपाकगृहातील उरलेल्या आहाराचा नमुना व इतर साहित्य तपासणीसाठी मनपा प्रयोगशाळेत पाठविले आहे. शांताई महिला संस्थेकडून सर्व शाळांना पुरवठा करण्याचे कामकाज थांबविण्यात आले असून सदर शाळांमध्ये पर्यायी संस्थांना आहार पुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांनी सदर घटनेची दखल घेऊन सदर घटनेबाबत जबाबदार संस्था व संबधित अधिका-यांची चौकशी करुन २४ तासांच्या आत अहवाल सादर करणे व दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment