मुंबई - बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याने किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव जवळपास दुप्पट वाढले आहेत. दोन, तीन दिवसांपूर्वीच किरकोळ बाजारात एक किलो कांदा ३० ते ४० रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र, आता एक किलो कांद्यासाठी ग्राहकाला ७० ते ८० रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र आहे. दरदिवशी कांद्याच्या दरात १० रुपयांची वाढ होत आहे. येत्या काळात तो १०० रुपयांवर जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातमूल्यात दुप्पट वाढ केली असून ती ८०० डॉलर प्रतिटन इतकी वाढविली आहे.
देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या बारा दिवसांत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात ६० टक्के वाढ झाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी २८७० रुपये मिळणारा बाजारभाव ५८६० रुपयांपर्यंत गेल्याने केंद्र सरकार खडबडून जागे होत नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा २५ रुपये किलो दराने बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला. याला २४ तास उलटत नाही, तोच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढत कांद्याच्या निर्यात शुल्क दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ४०० डॉलरवरून निर्यातशुल्क ८०० डॉलर केल्याने कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये या निर्णयाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
उत्पादकांच्या निर्णयाकडे लक्ष -
या अगोदर केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात शुल्क वाढ करत ४० टक्के केले. बाजार समित्या बंद ठेवून कांदा उत्पादक आणि व्यापा-यांनी या निर्णयाचा निषेध केला होता. आता कांदा निर्यात मूल्य दरात ८०० डॉलर प्रतिटन केल्याने कांदा उत्पादक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment