Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

४६ टक्के मुंबईकरांचे वजन सरासरीपेक्षा अधिक, महिलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा


मुंबई - जागतिक आरोग्य संघटना व बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे स्टेप्स सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार सुमारे ४६% नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे या सर्वेक्षणातुन समोर आले आहे. 

जागतिक आरोग्य संघटना व बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ % व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. प्री-डायबेटिस- (Impaired fasting glycemia) ची टक्केवारी १५.६% आहे. (रक्तातील साखरेचे प्रमाण ≥ ११० mg/dl आणि < १२६ mg/dl) आणि जर अशा व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाही, तर अशा व्यक्तींना पुढे जाऊन मधुमेह होऊ शकतो. ८.३% व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजार आढळले. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो व  सामान्यतः ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक व्यक्तींना प्रभावित करतो.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब विषयक आरोग्य चाचणी करून उपचार घेण्यासाठी मुंबईकरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने / हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी जीवनशैली विषयक योग्य बदल स्वीकारणे गरजेचे असून त्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून विविध सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 

मुंबईतील नागरिकांमध्ये लठ्ठपणा - 
मुंबईतील स्टेप्स सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, सुमारे ४६% नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे (WHO वर्गीकरणानुसार BMI 25 kg/M2 किंवा त्या पेक्षा जास्त). १२% मुंबईकर लठ्ठ (WHO वर्गीकरणानुसार BMI 30 kg/M2 किंवा त्या पेक्षा जास्त) असल्याचे आढळले.  लठ्ठपणा महिलांमध्ये जास्त आढळला.

घोषवाक्याचा खरा अर्थ साकार करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न - 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये मधुमेह संदर्भातील प्राथमिक चाचणी आणि निदान करण्याच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. महापालिका दवाखाना व आपला दवाखाना येथे प्रत्येक महिन्यात ६० ते ७० हजार नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येते आणि सुमारे ५० हजार रुग्ण नियमितपणे  मधुमेहासंदर्भातील उपचार घेत आहेत. ३० वर्षे पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची अधिकाधिक सक्षमरीत्या चाचणी करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या २६ रुग्णालयांमध्ये ऑगस्ट २०२२ पासून मधुमेह व उच्चरक्तदाब तपासणी केंद्र (NCD Corners) सुरु केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत २ लाख ५४ हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी १२% व्यक्तिमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण (random sugar) १४० मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक आहे. या सर्व व्यक्तींना संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

सर्व विभागात आरोग्य चाचणी सर्वेक्षण -
जानेवारी २०२३ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये, आरोग्य स्वयंसेविका / आशा सेविका यांच्या मार्फत लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने ३० वर्षे वयावरील व्यक्तींची उच्च रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत अंदाजे १३ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे त्यातील १२ हजार व्यक्तीना उच्चरक्तदाब असल्याचे आढळून आले आहे.

तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांना आहार विषयक सल्ला देण्याची/ समुपदेशन सेवा महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.आतापर्यंत ३२ हजार रुग्णांना आहार आणि दैनंदिन जीवनशैली बदल व मधुमेह संदर्भातील समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विभागात मनपा द्वारे चालू करण्यात आलेले योगा केंद्राचा लाभ नागरिकांनी घ्यावे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांसाठी जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम -
येत्या १४ नोव्हेंबर २०२३ जागतिक मधुमेह दिना निमित्ताने मुंबईतील उद्यानामध्ये मोबाईल व्हॅन, रेल्वे स्थानक, सामान्य सुविधा केंद्र (CFC wards ), मॉल्स मध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जाहिरात फलक (होर्डिंग), बॅनर, रेडिओ जिंगल द्वारे सामाजिक माध्यमातून नागरिकांसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.का

कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह म्हणाल्या की, मधुमेह असलेल्या व्यक्तींपैकी किमान ५० टक्के नागरिकांना आपल्याला मधुमेह झाला आहे, हे निदान होईपर्यंत प्रत्यक्षात ठाऊकच नसते. त्यामुळे आरोग्य विषयक गुंतागुंत टाळण्यासाठी जागरूक राहून नियमितपणे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom