Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

डिलाईल पुल वाहतुकीसाठी खुला, पुलाखाली उद्यान आणि क्रीडांगण


मुंबई - डिलाईल पुलाला जोडून जिने आणि सरकते जिने लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे पुलावरून चालण्यासाठी मार्गिका तयार करण्यात येईल.  पुलाखाली मोकळ्या जागेत उद्यान व क्रीडा तसेच मनोरंजनाच्या सुविधेसाठी देखील लवकरच भूमिपूजन करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. (Delille Bridge is open to traffic)

दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या डिलाईल पुलाचे लोकार्पण आज (दिनांक २३ नोव्हेंबर २०२३) सायंकाळी समारंभपूर्वक करून संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यावेळी केसरकर हे बोलत होते. यावेळी राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशीष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सदा सरवणकर, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार किरण पावसकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (पायाभूत प्रकल्प) मधुसुदन सिंह, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) (अतिरिक्त कार्यभार) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर, रेल्वेचे कार्यकारी अभियंता हरीश मीना, विभागीय अभियंता रिषभ सिंह चौहान, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.   

याप्रसंगी पालकमंत्री केसरकर म्हणाले की, डिलाईल पूल वाहतूकीप्रमाणेच पादचाऱ्यांसाठीदेखील महत्वाचा आहे, हे लक्षात घेऊन या पुलाला जिने आणि सरकते जिने जोडण्यात येणार आहेत. पुलावर पादचाऱ्यांसाठी मार्गिकेची सुविधा करण्यासाठी निर्देश दिले आहेत. या पुलाखाली उपलब्ध झालेल्या जागेचा नागरी हिताच्या दृष्टीने उद्यान, क्रीडांगण व मनोरंजन आदी कारणांसाठी विकास करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरात प्रवेशाची स्थानिक नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात येईल. स्थानिक पातळीवर नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याअनुषंगाने मार्केटच्या ठिकाणी नवा आराखडा अंमलात येईल. तसेच मार्केटमध्ये मासळी विकणाऱ्यांसाठी अधिक सुविधा देण्याच्या अनुषंगाने चांगल्या दर्जाचे स्टॉल उभारणीही या ठिकाणी करण्यात येईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली. नागरिकांना सरकत्या जिन्याची व्यवस्था प्राधान्याने करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या पुलाचे नामकरण करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री लोढा यांनी नमूद केले.

आमदार आशीष शेलार म्हणाले की, या पुलाच्या पूर्णत्वासाठी सर्वांनीच योगदान दिले आहे. रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यादरम्यान समन्वय साधून सर्व समस्यांवर मात करत हा प्रकल्प आज लोकांसाठी खुला झाला आहे. या पुलाच्या भागातून चालण्याची व्यवस्था, सरकता जिना यासाठीचे कंत्राट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. ही कामेदेखील कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच पुलाखालील जागेचा उपयोग करून कबड्डी, खो खो यासारख्या क्रीडा तसेच इतर मनोरंजन सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात येतील, असे शेलार यांनी नमूद केले.

आमदार सुनील शिंदे म्हणाले की, जवळपास साडेपाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वाहतुकीसाठी डिलाईल पुलाची पूर्ण क्षमतेने सुविधा उपलब्ध होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजुला चालण्याची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. या मागणीची पूर्तता करण्यात यावी, तसेच परिसरातील नो पार्किंग संदर्भातील पोलीस प्रशासनाच्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा, अशी विनंती शिंदे यांनी केली. तसेच विकास नियोजन आराखड्यात प्रस्तावित लोअर परळ ते एनटीसी मिल दरम्यान पुलाचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी जाहीरपणे केली. 

प्रास्ताविकातून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी डिलाईल पूल प्रकल्पाची सविस्तर माहिती तसेच त्यासाठीचे प्रशासनाने केलेले प्रयत्न आणि लोकप्रतिनिधींचे मिळालेले सहकार्य याचा उल्लेख केला. रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून विक्रमी वेळेत या आव्हानात्मक प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एन. एम. जोशी मार्ग ते गणपतराव कदम मार्ग दरम्यानची मार्गिका १ जून २०२३ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. तर पूर्व पश्चिम एक मार्गिकेचा पर्याय १७ सप्टेंबर २०२३ पासून खुला करून देण्यात आला. तर दुसऱ्या मार्गिकेचा पर्याय आजपासून वाहनचालकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजेच आज संपूर्ण प्रकल्प खुला होत आहे. अत्याधुनिक व वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने जुन्या पुलाच्या तुलनेत या नवीन पुलावर जास्त संख्येने मार्गिका उपलब्ध झाली आहे. याचा फायदा वाहतुकीचा वेग वाढण्यात होईल. तसेच पुलाच्या खालीदेखील सुमारे दोन एकर क्षेत्रफळ उपलब्ध झाले असून या जागेवर उद्यान, क्रीडांगण, मनोरंजन यादृष्टीने सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. तसेच सरकते जिने उपलब्ध झाल्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाची उपयुक्तता आणखी वाढेल, असे वेलरासू यांनी नमूद केले.   

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून संपूर्ण डिलाईल पूल प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच कोनशिला अनावरण करण्यात आले. या भागातील शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक तथा जेष्ठ नागरिक प्रवीण देव्हारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधीवत लोकार्पण करण्यात आले. उपायुक्त कांडलकर यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom